तालिबानकडून घेतले होते प्रशिक्षण ः मुंबईत देण्यात आला होता इशारा
वृत्तसंस्था / इंदोर
पीएफआयच्या अवैध कारवायांमध्ये सामील राहिलेला वाँटेड दहशतवादी सरफराज मेमनला इंदोरमध्ये अटक करण्यात आली आहे. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी याची पुष्टी दिली आहे. एनआयएने सरफराज मुंबईत दहशतवादी हल्ला घडवून आणण्याच्या प्रयत्नात असल्याचा अलर्ट सोमवारीच जारी केला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी इंदोर पोलिसांशी संपर्क साधला होता.
सरफराज हा इंदोरच्या खजराना भागात दीर्घकाळापासून राहत होता. त्याने तेथे एक मेडिकल स्टोअरही सुरू केले होते. सरफराजला अनेक भाषा अवगत आहेत. मुंबई पोलीस आणि एनआयएकडून सोमवारी इंदोर पोलिसांना एक इनपूट मिळाला होता, ज्यात सरफराजने मुंबईत पाहणी केल्याचे नमूद होते.
सरफराजची सुरक्षा यंत्रणा आता कसून चौकशी करत आहेत. मुंबई पोलिसांचे पथकही इंदोरमध्ये पोहोचले आहे. सरफराजने हाँगकाँगमध्ये चिनी महिलेशी विवाह केला होता. या महिलेसोबत भांडण झाल्यावर तो भारतात दाखल झाला होता. भारतातही त्याने 4 विवाह केले होते. त्याच्या चारही पत्नी अन् संबधितांची आता चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस अधिकारी रजत सकलेचा यांनी सांगितले आहे.
गुप्तचर पथकाने इंदोरमधील त्याच्या घराची झडती घेत त्याच्या आईवडिलांची चौकशी केली आहे. याचबरोबर अन्य दोन जणांची चौकशी करण्यात आली आहे. सरफराज वारंवार विदेशात का जात होता याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरफराज अन्य काही गुन्हय़ांमध्ये सामील होता असे अधिकाऱयांकडून सांगण्यात येत आहे.
अनेक भाषा अवगत
सरफराज मेमनने पाकिस्तान, चीन आणि हाँगकाँगमध्ये दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतल्याचे सांगण्यात येते. सरफराजला स्पॅनिश, चिनी आणि इंग्रजीसह हिंदी भाषा अवगत आहे. त्याचा पासपोर्ट देखील हाँगकाँगमधून जारी झालेला आहे. सरफराजने 12 वर्षांपर्यंत हाँगकाँगमध्ये वास्तव्य केले आहे. तालिबानकडून विशेष प्रशिक्षण मिळविल्यावर तो भारतात कारवाया करू पाहत होता असे समजते.
3 फेब्रुवारीला एनआयएला ईमेल
तालिबानने 3 फेब्रुवारी रोजी एनआयएला मेल पाठविला होता. यानंतर सरफराजचे इंदोर कनेक्शन स्पष्ट झाल्यावर एनआयएने तातडीने पावले उचलली होती. या मेलमध्ये दहशतवादी सिराजुद्दीन हक्कानीच्या आदेशानुसार मुंबईत सरफराज मेमन दहशतवादी कारवायांसाठी सक्रीय असल्याचे आणि मोठा हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचे नमूद होते.