मंगळवारी कोणत्याही प्रकारचा आवाज नाही
बेळगाव : हा आवाज, नक्की कोणाचा? या तरुण भारतच्या वृत्ताची बुधवारी दिवसभर चर्चा सुरू राहिली. तरुण भारतने केलेला व्हिडिओसुद्धा लक्षणीय प्रमाणात व्हायरल झाला. सावगाव येथील ग्रामस्थ आणि अंनिसचे कार्यकर्ते यांची मते विचारात घेऊन वृत्त प्रकाशित केले आणि सध्या सावगावमध्ये कसे चित्र आहे, याचे वस्तुनिष्ठ वृत्तांकन केले. य् ााबाबत अंनिसचे कार्यकर्ते राहुल पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी मंगळवारी रात्री सावगाव येथे जाऊन पहाटेपर्यंत वेगवेगळ्या भागात फेऱ्या मारल्या आणि आवाज कोठून येतो, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आश्चर्य म्हणजे मंगळवारी असा कोणत्याही प्रकारचा आवाज त्यांच्या कानी पडला नाही. काही माध्यमांचे प्रतिनिधीसुद्धा मंगळवारी रात्री सावगावमध्ये गेले होते. दरम्यान बाहेरील कार्यकर्ते गावात ठाण मांडून आवाजाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करत असताना त्यादिवशी कोणताच आवाज येवू नये, हे आश्चर्य आहे आणि त्यामुळे हा आवाज हेतूत: भीती किंवा दहशत निर्माण करण्यासाठी एखादी व्यक्तीच काढते आहे का? या तर्काला पुष्टी मिळत आहे. हा आवाज एखाद्या प्राण्याचा आहे का? याचीही माहिती तरुण भारतने घेतली. प्राणी व पक्षीतज्ञ निरंजन संत यांनी हा आवाज प्राण्याचा नक्कीच नाही तर एखाद्या माणसाचाच तो आवाज आहे, असे स्पष्ट केले. एकूणच आवाज कोणाचा? याबद्दलच्या चर्चांना ऊत आला आहे.