5 भाषा अवगत ः सूरतमध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत घेतली दीक्षा
वृत्तसंस्था/ सूरत
गुजरातच्या सूर येथील हीरेव्यापारी संघवी मोहन भाई यांची नात आणि धनेश-अमीबेन यांची 9 वर्षीय मुलगी देवांशीने संन्यास घेतला आहे. देवांशीचा दीक्षा महोत्सव वेसूमध्ये 14 जानेवारी रोजी सुरू झाला होता. बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून तिची दीक्षा सुरू झाली. देवांशीने 35 हजारांहून अधिक लोकांच्या उपस्थितीत जैनाचार्य कीर्तियशसूरीश्वर महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली आहे.
सूरतमध्ये देवांशीची वर्षीदान यात्रा काढण्यात आली आणि यात 4 हत्ती, 20 अश्व आणि 11 उंटांना सामील करण्यात आले होत. यापूर्वी मुंबई आणि एंट्वर्पमध्ये देवांशीची वर्षीदान यात्रा काढण्यात आली होती. देवांशीला 5 भाषा अवगत असून ती संगीत, स्केटिंग, मेंटल मॅथ्स आणि भरतानाटय़ममध्ये पारंगत आहे. देवांशीला वैराश्य शतक आणि तत्वार्थचे अध्याय यासारखे महाग्रंथ मुखोद्गत आहेत.
कधीच पाहिला नाही टीव्ही
देवांशीने वयाच्या 8 वर्षांपर्यंत 357 दीक्षा दर्शन, 500 किमी पायी विहार, तीर्थांची यात्रा आणि अनेक जैन ग्रंथांचे वाचन करत तत्वज्ञान समजून घेतले. माझ्या मुलीने कधीच टीव्ही पाहिला नाही, तसेच जैन धर्मात प्रतिबंधित गोष्टींचा कधीच वापर केला नाही. देवांशीने केवळ धार्मिक शिक्षणात लक्ष दिल्याचे तिच्या आईवडिलांनी सांगितले आहे.