नीरा नदीत उडी टाकून केली आत्महत्या
वार्ताहर/ शिरवळ
पणन विभागाचे सहसंचालक शशिकांत घोरपडे हे दि. 12 बुधवारपासून बेपत्ता होते व त्यांची गाडी शिरवळनजीक शिंदेवाडी परिसरात आढळून आल्याने तसेच जवळच्या एका हॉटेलमध्ये त्यांनी चहा पिल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे शेवटचे लोकेशन सारोळा निरा नदीवरील पूल परिसरात असल्याचे आढळून आले. नजीकच्या काळात सारोळा पुल हा सुसाईड पॉईंट म्हणून ओळखला जात असल्याने पोलिसांची शोधमोहीम आपसूकच नीरा नदीपात्राकडे वळली होती. अखेर अथक शोधकार्यानंतर शुक्रवार 14 रोजी सकाळी 11 चे दरम्यान शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, राज्याच्या सहकारी संस्थेचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे (वय 48 वर्ष, रा. गोखलेनगर, पुणे) हे पुणे शिवाजीनगर येथील कार्यालयातून मित्र प्रदीप मोहिते यांची कार क्रमांक एम एच 11 सी डब्ल्यू 4244 घेऊन कार्यालयातून बाहेर पडले होते. परंतु रात्री उशिरापर्यंत घरी न पोहोचल्याने कुटुंबीय व नातेवाईकांनी सगळीकडे शोधमोहीम राबवली असता गाडीचे फास्ट टॅगवरून गाडी खेड शिवापूर टोलनाक्यावरून पुढे मार्गस्थ झाल्याचे समजले. नंतर पुढे शोध घेतला असता शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमधील शिंदेवाडी गावच्यानजीक एका कंपनीसमोर त्यांची कार सापडून आली. त्यामुळे ते बेपत्ता झाल्याची फिर्याद शिरवळ पोलीस ठाण्यात नोंदवल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. त्याचवेळी नीरा नदीपात्रालगतच्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती नीरा नदी पात्राकडे जात असल्याचे दिसल्याने घोरपडे यांनी नीरा नदी पात्रात आत्महत्या केल्याचा संशय बळावला होता. त्यामुळे शिरवळ पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सहा. पोलीस उपनिरीक्षक अनिल बारेला, आप्पा कोलवडकर, संतोष नलावडे, राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पो. नाईक गणेश लडकत, पुणे ग्रामीणचे किकवी दूरक्षेत्रातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, महाबळेश्वर ट्रेकर्स, शिरवळ रेस्क्यू टीम व स्थानिक मच्छीमार यांच्यामार्फत काल दिवसभर रात्रीपर्यंत शोध घेण्यात आला होता. मात्र अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आले.
शुक्रवारी सकाळी पुन्हा एनडीआरएफ टीम तसेच शिरवळ व राजगड पोलिसांच्या जवळपास 45 जणांच्या शोध पथकाने शोधकार्य सुरू ठेवले होते. अखेरीस 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजण्याचे सुमारास शशिकांत घोरपडे यांचा मृतदेह नीरा नदी पात्रात आढळून आला. कालच उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, खंडाळा तहसीलदार दशरथ काळे यांनी घटनास्थळी भेट दिली होती. शिरवळ पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण अजूनही समजले नसून अधिक तपास शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने करीत आहेत.