प्रतिनिधी
बांदा
इन्सुली – गावडेवाडी येथील बेपत्ता महिला रुक्मिणी नारायण गावडे (४७) यांचा मृतदेह आज सकाळी तेरेखोल नदीत तुळसाण पुलानजीक आढळून आला. त्या गुरुवार संध्याकाळ पासून बेपत्ता होत्या. गुरुवारी त्या कपडे धुण्यासाठी इन्सुली गावठण येथील तेरेखोल नदीपात्रात गेल्या असताना पाय घसरून नदीत वाहून गेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.गुरुवारपासून इन्सुली ग्रामस्थांनी नदीपात्रालगत त्यांची सर्वत्र शोधाशोध करुनही आढळून न आल्याने बेपत्ता असल्याची तक्रार बांदा पोलिसात दिली होती. दरम्यान सकाळी दहाच्या सुमारास तिचा मृतदेह तेरेखोल नदीपात्रात तुळसाण पुलाखाली असल्याचे दिसून आले.
याबाबत ची माहिती मिळताच इन्सुली ग्रामस्थांनी तुळसाण येथे धाव घेतली. तेरेखोल नदीपात्र दुथडी भरून वाहत असल्याने मृतदेह काढण्याचे मोठे आव्हान होते . मात्र पोलीस कॉन्स्टेबल सिद्धार्थ माळकर, ग्रामस्थ विकास केरकर व संजय दळवी यांनी नदीपात्रात उडी घेत दोरीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढला.यावेळी बांदा पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले आदींसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला आहे. इन्सुली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.