आयसीसीकडून शिक्कामोर्तब : सर्व संघांना सुरक्षा पुरवण्याचे पाक बोर्डाकडून आश्वासन
वृत्तसंस्था/ दुबई
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड करणार आहे. पीसीबीचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी दुबई येथे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदासाठीच्या आयसीसीच्या करारावर स्वाक्षरी केली. यामुळे हायब्रिड मॉडेलनुसार अन्य कोणत्याही देशात किंवा इतरत्र सामने खेळवण्याच्या शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे. पीसीबी अध्यक्षांनी दुबईतील आयसीसी मुख्यालयात महाव्यवस्थापक जोनाथन हॉल यांच्यासोबत करारावर स्वाक्षरी केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे या करारावर स्वाक्षरी केल्याची माहिती दिली. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी येणाऱ्या संघांना सुरक्षा पुरविण्यात येणार असल्याचे आश्वासन पीसीबीने आयसीसीला दिले आहे. मात्र या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.