प्रतिनिधी/ लातूर
जिंतूर येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील उपाहारगृहाच्या पाठीमागे याच महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक शाखेत कार्यरत असलेल्या 45 वषीय प्राध्यापकाचा मृतदेह आढळला आहे. यामुळे शहरात चर्चेला उधाण आले असून आत्महत्या, हत्या की अतिमद्यप्राशन हे शवविच्छेदन अहवालनंतर समोर येणार आहे.
जिंतूर (जि. परभणी) येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये इलेक्ट्रॉनिक शाखेत कार्यरत असलेले प्राध्यापक जगदीश गव्हाणे (रा. लातूर) हे दीपावलीच्या सुटय़ानंतर महाविद्यालयात आले होते. परंतु आज 10 नोव्हेंबर रोजी सकाळी महाविद्यालयातील विद्यार्थी उपहारगृहात असताना पाठीमागे खिडकीतून विद्यार्थ्याने पहिले असता सेफ्टी टँकजवळ झुडपात मृतदेह पडलेला दिसला होता. यावरून प्राचार्या राऊत यांनी पोलिसांना माहिती दिली. यावरून तातडीने पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी सहकारी पो. कॉ. लिला जोगदंड, हके, पो. कॉ. अनिल शिंदे आदींनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. एकंदरीत प्राध्यापकाचा मृतदेह आढळल्यामुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. मृत प्राध्यापक हा लातूर येथील असून त्यास एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
विद्यार्थ्यांनी दिली माहिती- प्राचार्या राऊत
घटनास्थळी मृतावस्थेत असलेल्या प्राध्यापकाचे बूट इतरत्र पडलेले होते. बाजूलाच दारूच्या बाटल्या आढळून आल्या असून मोबाईल गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राध्यापक गव्हाणे हे मागील पाच ते सहा वर्षांपासून सेवेत होते. आज गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास शासकीय तंत्रनिकेतन परिसरात उपहारगृहाच्या पाठीमागे मृतदेह असल्याचे काही विद्यार्थ्यांना दिसताच मला माहिती मिळताच मी तत्काळ पोलिसांना कळविले आहे.