सफाईदरम्यान मिळाली गुप्त डायरी
न्यूझीलंडचे खासदार अन् जागतिक शांतता परिषदेचे अध्यक्ष राहिलेले जेरल्ड ओ ब्रायन यांच्या गुप्त काल्पनिक जगाबद्दल आतापर्यंत कुणालाच कल्पना नव्हती. 2017 मध्ये त्यांच्या निधनानंतर वेलिंग्टन येथील घर रिकामी केले जात असतान तळघराची सफाई करण्यात आली असता अशी गुपिते उघड झाली, जी प्रत्यक्षात अद्भूत होती.
प्रत्यक्षात जेरल्ड यांची एक क्राफ्ट डायरी मिळाली असून यात त्यांनी जगभरातील शक्तिशाली नेत्यांची एक काल्पनिक प्रतिमा पूर्ण पोशाखासह तयार केली होती. त्यांनी विश्व शांती परिषदेचे पूर्ण काल्पनिक जग याच क्राफ्टबुकमध्ये रेखाटले होते. याविषयी त्यांची 60 वर्षीय पत्नी फॉस्टा यांनाही कुठलीच माहिती नव्हती.
700 हून अधिक नेत्यांचे कटआउट
या अत्यंत जटिल कामासाठी अनेक तास खर्च केले असतील हे त्यांच्या कुटुंबीयांना माहित नाही. तळघरातील अनेक बॉक्समध्ये 700 हून अधिक नेत्यांचे कट-आउट मिळाले. पूर्ण पोशाख अन् चेहऱयाच्या भावासह पात्रांची नावे आणि उपाधीही यात लिहिलेली होती. एस्कोटियाचे किंग चार्ल्स तृतीय आणि फिडेल कॅस्ट्रो देखील जेरल्ड यांच्या काल्पनिक जगातील पात्रं होती असे त्यांचे पुतणे लुसिएन रिजोस यांनी सांगितले आहे.
काल्पनिक देश अन् नकाशे
जेरल्ड यांनी एस्कोटिया, अंडमिया आणि गॅस्टन यासारख्या काल्पनिक देशांचे नकाशे तयार करून ठेवले होते. राजकीय जीवन, घोटाळय़ांचा तपशील देखील यात सामील आहे. ऑक्टोबर महिन्यात व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटी ऑफ वेलिंग्टनच्या ऍडम आर्ट गॅलरीत ही डायरी सार्वजनिक केली जाणार आहे.