काँक्रिटचे तुकडे पडण्यास पुन्हा सुरुवात, शेकडो लोकांची रोज होते ये-जा
प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडे व सावर्डेला जोडणारा जो उड्डाणपूल कित्येक काळापासून हजारो गाडय़ांची वाहतूक सहन करत आला आहे त्या पुलाचे परत एकदा पाऊस सुरु झाल्यापासून काँक्रिटचे तुकडे पडू लागल्याने येथून जाणाऱया लोकांना धोका निर्माण झाला आहे. लोकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन वर्षांअगोदर अशाच प्रकारे सदर पुलाचे काँक्रिटचे तुकडे पडू लागून आतमधील लोखंडी सळ्या दिसू लागल्या होत्या. त्यानंतर ताबडतोब त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. पण सदर दुरुस्ती केलेले भाग व्यवस्थित असून सध्या अन्य भागांतील काँक्रिटचे तुकडे पडण्यास सुरुवात झाली आहे. ही स्थिती धोकादायक असून या पुलाच्या खालून शाळेचे विद्यार्थी व अन्य शेकडो लोकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे स्थानिक आमदारांनी यात तत्परतेने लक्ष घालावे व उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.