अजब आजाराचा शिकार
काही जणांना धूळीच्या संपर्कात आल्यास सर्दी अन् खोकल्याचा त्रास होत असतो. तर काही जणांना अन्य कारणांची ऍलर्जी असते. परंतु एखाद्या सूर्यकिरणांची ऍलर्जी असेल तर त्याची काय अवस्था होईल याचा विचार करा. ब्रिटनमध्ये एका मुलाला अशाच प्रकारच्या ऍलर्जीला सामोरे जावे लागत आहे. सर्वसामान्य मुलांप्रमाणे तो घराबाहेर पडून खेळू शकत नाही. पार्कमध्ये जाऊ शकत नाही. 24 तास या मुलाला घरातच काढावे लागतात. एका दुर्लभ आजारामुळे त्याच्यावर ही स्थिती ओढवली आहे.
8 वर्षीय पॅट्रिक अस्कम हा गॅस्ट्रोस्किसिस नावाच्या एका दुर्लभ आजारासह जन्माला आला आहे. याच्या बेंबीच्या बाजूला एक छिद्र होते, यातून त्याचे अवयय शरीराबाहेर आले होते. शस्त्रक्रियेच्या माध्यमातून हे अवयव अन् आतडय़ांना पुन्हा शरीरात योग्य स्थानी ठेवण्यात आले होते. यातून पॅट्रिक बरा झाला होता, परंतु आता त्याच्या समस्येने विक्राळ स्वरुप धारण केले आहे.
5 अवयवयांचे प्रत्यारोपण
पॅट्रिकच्या हृदय तसेच अन्य आतडय़ांसमवेत 5 अवयवांचे प्रत्यारोपण करावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या साहसी मुलाचे वयाच्या आठव्या वर्षीच पहिले बोवेल प्रत्यारोपण झाले आहे, परंतु हृदयाशी निगडित गुंतागुंतीमुळे त्याचे अन्य अवयव सडू लागले. याचमुळे त्याच्या एका यकृतासह 4 अवयवांचे प्रत्यारोपण करावे लागले. अवयवांच्या प्रत्यारोपणामुळे त्याच्या शरीराने प्रतिकारक क्षमता म्हणजेच आजारांपासून लढण्याची क्षमता गमाविली आणि याचमुळे त्याला सूर्यकिरणांची ऍलर्जी झाली आहे. सूर्यकिरणांच्या ऍलर्जीमुळे पॅट्रिकचे शरीर दुर्लभ समस्यांनी ग्रस्त झाले आहे.
पूर्ण जीवन घरातच काढावे लागणार
या समस्यांमुळे पॅट्रिकला पूर्ण जीवन घरातच काढावे लागणार आहे. सूर्यप्रकाशात तो जाऊ शकत नाही अवयवांच्या प्रत्यारोपणामुळे त्याची प्रतिकारकक्षमता संपुष्टात आली आहे. या स्थितीला इम्युनोसप्रेशन म्हटले जाते. उन्हात येताच त्याचे शरीर प्रतिकूल स्वरुपात प्रतिक्रिया देऊ लागते. यामुळे तो आता कधीच घरातून बाहेर पडू शकत नाही. मित्रांसोबत खेळू शकत नाही. त्याच्यामुळे आम्हाला सर्व सुटय़ा घरातच घालवाव्या लागतात. त्याला नियमित स्वरुपात औषधे द्यावी लागतात. तरीही पॅट्रिकने हार मानलेली नाही, तो एक सुपरहीरो आहे. आम्ही आमच्या बगीच्यात एक छोटे घर तयार करण्याचा विचार करत आहोत असे पॅट्रिकची आई मिशेल यांनी सांगितले आहे.