वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पीएम किसान सन्मान निधीचा 14 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार, 27 जुलै रोजी सुमारे 8.5 कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जारी करतील. पंतप्रधान 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता राजस्थानमधील सीकरमधून शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये हस्तांतरित करतील. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत एका आर्थिक वर्षात शेतकऱ्यांच्या कुटुंबांना 6,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार रुपयेप्रमाणे लाभार्थ्यांना ही रक्कम डीबीटीद्वारे थेट बँकखात्यात प्राप्त होते. यापूर्वी 13 वा हप्ता 27 फेब्रुवारी 2023 रोजी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला होता.
देशभरातील शेतकरी पीएम किसान योजनेच्या 14व्या हप्त्याची अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत आहेत. नुकतीच 14वा हप्ता शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्याची तारीख सरकारने जाहीर केली आहे. त्यानुसार 27 जुलै रोजी देशातील 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 ऊपये हस्तांतरित केले जातील. राजस्थानमधील सीकरमध्ये आयोजित मेळाव्यात अनेक शेतकरीही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.