धाकधूक वाढली, बदल्यांचे वेळापत्रक जाहीर : दिव्यांग, विधवा, आजारी शिक्षकांना यादीतून वगळले
प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षकांच्या बदल्यांची प्रतीक्षा अखेर मिटली आहे. राज्य सरकारने बदलीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बुधवार दि. 28 रोजी अतिरिक्त शिक्षकांची यादी जाहीर होणार आहे. 28 डिसेंबर ते 28 फेब्रुवारीपर्यंत बदली प्रक्रिया चालणार आहे. अतिरिक्त शिक्षकांची यादी जाहीर होणार असल्याने बेळगाव शहरातील शिक्षकांची धाकधूक वाढली आहे.
मागील अनेक दिवसांपासून शिक्षक बदलीची प्रक्रिया ठप्प होती. शहरी भागात विद्यार्थी संख्येनुसार अधिक तर ग्रामीण व दुर्गम भागात शिक्षकांची संख्या अत्यल्प होती. हे लक्षात आल्यानंतर शिक्षण विभागाने अतिरिक्त शिक्षकांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले. दिव्यांग, विधवा, तसेच आजारी शिक्षकांना अतिरिक्त शिक्षकांच्या यादीतून वगळण्यात आले.
मागील 15 दिवसांपासून अतिरिक्त शिक्षकांची यादी तयार करण्याचे काम सुरू होते. काही शिक्षकांनी वैद्यकीय आजाराचे प्रमाणपत्र जोडत बदली प्रक्रियेतून सवलत मिळावी यासाठी विनंती केली होती. त्यामुळे अतिरिक्त यादी केव्हा जाहीर होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर राज्य सरकारने शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला हिरवा कंदील दाखविल्यानंतर सोमवारी वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
28 डिसेंबर ते 28 फेब्रुवारीदरम्यान बदली प्रक्रिया चालणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षापूर्वी शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. अतिरिक्त शिक्षकांची यादी 28 डिसेंबरला विभागवार प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीवर आक्षेप असल्यास 30 डिसेंबरपर्यंत जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात आक्षेप नोंदवावे लागणार आहेत. त्यानंतरच्या महिनाभराच्या कालावधीत नोंदविण्यात आलेला आक्षेप स्वीकारायचा की नाकारायचा ही प्रक्रिया चालणार आहे.
200 हून अधिक शिक्षक होऊ शकतात अतिरिक्त
अनेक शिक्षक शहरांतर्गत भागात नोकरी करण्यात इच्छुक असतात. मागील अनेक वर्षांपासून अनेक शिक्षक शहरातील विविध शाळांमध्ये सेवा बजावत आहेत. ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या शिक्षकांना शहरात नेमणुका कराव्यात यासाठी मागणी होत असताना शहरी भागातील शिक्षक मात्र ग्रामीण भागात जाण्यास इच्छुक नसतात. आता मात्र अतिरिक्त शिक्षकांची यादी जाहीर झाल्यास शहरातील अनेक शिक्षकांना दुर्गम व ग्रामीण भागात जावून सेवा बजावावी लागणार असल्याने शिक्षकांची धाकधूक वाढली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात अंदाजे 200 हून अधिक अतिरिक्त शिक्षक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.