सेन्सेक्स 89 अंकांनी वधारला ः कच्चे तेलाच्या नरमाईचा बाजाराला फायदा
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी बाजार सावरल्याचे दिसून आले आहे. यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरण बैठकीत रेपोदरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक तेजीसह बंद झाल्याचे दिसून आले.
शेअर बाजारात विदेशी भांडवलाची आवक वाढल्याने व कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये नरमाईचा कल राहिल्याचा फायदा हा सेन्सेक्स व निफ्टी यांना झाल्याचे दिसून आले. यामुळे बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 89.13 अंकांनी वधारुन तो 58,387.93 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 15.50 अंकांनी वधारुन निर्देशांक 17,397.50 वर बंद झाला आहे. दिवसभरात काहीवेळ सेन्सेक्स हा 350.39 अंकांच्या उच्चांकावर राहिला होता. मात्र अंतिम टप्प्यात काहीवेळ चढउतार राहिला होता.
आरबीआय निर्णयाचा प्रभाव
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) यांच्याकडून शुक्रवारी पतधोरण बैठकीमध्ये व्याजदरात वाढ करणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये आरबीआय रेपोदर 0.50 टक्क्यांनी वाढवून तो 5.40 टक्के केला आहे. जो मागील तीन महिन्यांच्या कालावधीत तिसऱयांदा वाढविला आहे. कोरोना महामारीच्या अगोदर फेब्रुवारी 2020 मध्ये रेपोदर 5.15 टक्के होता. या निर्णयाचा आगामी काळात शेअर बाजारातील कामगिरीवर परिणाम होणार असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
जगभरातील अन्य बाजारांपैकी आशियातील दक्षिण कोरियाचा कॉस्पी, चीनचा शांघाय कम्पोजिट, जपानचा निक्की आणि हाँगकाँगचा हँगसेंग वाढीसह बंद झाले आहेत. यावेळी आंतरराष्ट्रीय तेल मानक बेंट क्रूड 0.18 टक्क्यांनी वधारुन 94.29 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, पॉवरग्रिड कॉर्प, इन्फोसिस, विप्रो आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग तेजीमध्ये राहिले होते. तर दुसऱया बाजूला महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, मारुती सुझुकी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इंडसइंड बँक यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत.