समस्त शिवप्रेमींचे कळंगुटमध्ये दिवसभर आंदोलन : सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी मागितली माफी,आदेश मागे घेत असल्याची केली घोषणा
म्हापसा : कळंगुट येथील पोलीस स्थानकासमोर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हटविण्याचा आदेश कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी सोमवारी दिल्यानंतर काल मंगळवारी सकाळी कळंगुटसह गोव्याच्या विविध भागातून आलेल्या शिवप्रेमींनी पंचायत कार्यालयासमोर दिवसभर आंदोलन करुन तो आदेश रद्द करण्याची मागणी केली. दिवसभर झालेल्या जोरदार धुमश्चक्रीनंतर शेवटी सायंकाळी ‘जर कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर आपण माफी मागतो, पंचायतीने पुतळा 10 दिवसात हटविण्यासाठी दिलेला आदेशही मागे घेतो’ अशा शब्दांत स्पष्ट आश्वासन सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी सर्वांसमक्ष हात जोडून दिल्यानंतर अखेर या वादावर पडदा पडला. पंचायतीने 10 दिवसाच्या आत शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्याचा जो आदेश काढला आहे, तो त्वरित रद्द करावा. तसेच सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी पुतळ्यासमोर येऊन माफी मागावी. अन्यथा आम्ही सर्वजण जेलभरो आंदोलन छेडण्यासही तयार असल्याचा इशारा देत शिवप्रेमींनी दिवसभर केलेल्या आंदोलनामुळे शिवप्रेमींपुढे हतबल झाले. संध्याकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी पुढाकार घेत सिक्वेरा यांना पंचायत कार्यालयाबाहेर आणण्यात यश मिळविले. कडक बंदोबस्तात जोसेफ सिक्वेरा यांना पंचायत इमारतीच्या दारावर आणले आणि तेथे त्यांनी सर्वांसमक्ष माफी मागितली.
सोमवारी रात्रीपासून वातावरण तंग
कळंगूट पोलीस स्थानकाला लागूनच वळणावर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा शिवस्वराज्य कळंगूटतर्फे 3 जून रोजी उभारण्यात आला होता. त्याठिकाणी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी विजेचा खांब उभारण्याचा ठराव घेतला होता. मात्र त्याठिकाणी पुतळा उभारण्यात आला. सोमवारी सायंकाळी शिवस्वराज्य संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मठकर यांना सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी नोटीस बजावून हा पुतळा 10 दिवसाच्या आत हटविण्यास बजावले. ही गोष्ट वाऱ्यासारखी संपूर्ण गोवाभर पसरली. त्या रात्री उशिरापर्यंत शिवप्रेमी पुतळ्याजवळ ठाण मांडून राहिले होते. त्याचबरोबर समस्त शिवप्रेमींना मंगळवारी कळंगुटमध्ये यावे, अशी हाकही देण्यात आली होती.
राज्यभरातून जमले शिवप्रेमी
काल मंगळवारी सकाळी सर्व शिवप्रेमी श्री शांतादुर्गा मंदिराच्या सभागृहात जमा झाले. देवी शांतादुर्गेला गाऱ्हाणे घालण्यात आले. हातात भगवे घेऊन जमलेल्या शिवप्रेमींनी ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणांद्वारे सारा परिसर दणाणून सोडला. सरंपच जोसेफ सिक्वेरा यांच्यासह पंचायत सदस्यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या जात होत्या. शिवप्रेमींनी कार्यालयात प्रवेश करू नये यासाठी कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारच्यावेळी दोनदा पोलीस व शिवप्रेमी यांच्यामध्ये बाचाबाची झाली. वातावरण तंग झाले. या घटनेची माहिती मिळताच राज्यभरातून मोठ्याप्रमाणात शिवप्रेमी जमा झाले. त्यांनी जोसेफ सिक्वेरा यांना पंचायत कार्यालयातून बाहेर आणण्याच्या एकाच मागणीवर जोर धरला.
निर्णय स्थगित ठेवण्याचा आदेश
उपजिल्हाधिकारी यशस्वीनी बी यांनी या प्रकाराची दखल घेत पंचायतीला संबंधित निर्णय स्थगित ठेवण्याचा आदेश दिला. मात्र शिवप्रेमींचे त्यावर समाधान झाले नाही. हा निर्णय पंचायतीने रद्दच करण्याच्या मागणीवर शिवप्रेमी अडून बसले. पोलिसांनीही जोसेफ सिक्वेरा यांना समजावण्याचा प्रयत्न केला.
दगडफेक, धक्काबुक्कीचा प्रकार
निर्णय स्थगित ठेवणे मान्य नसून तो रद्द करण्यात यावा ही मागणी लावून धरण्यात आली. दुपारनंतर संतप्त शिवप्रेमींना आवरणे पोलिसांना कठीण होऊन बसले. त्यातच धक्काबुक्की होण्याचा प्रकारही घडला. त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. यावेळी चर्चेसाठी सरपंच जोसेफ सिक्वेरा येत नसल्याचे पाहून शिवप्रेमींनी पंचायतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना रोखत कार्यालयाचे शटर बाहेरून बंद केले. यावेळी शिवप्रेमींकडून पंचायत कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. यावेळी वातावरण आणखी तंग झाले.
शिवप्रेमी, सिक्वेरा समर्थकांमध्ये बाचाबाची
परिस्थिती हाताबाहेर जात असताना दिसत होती. सरपंच सिक्वेरा यांनी राजीनामा देण्याची मागणी करीत शिवप्रेमी आक्रमक झाले असतानाच पंचायतीसमोर सिक्वेरांचे समर्थकही दाखल झाले. त्यामुळे वातावरण आणखी तापले. शिवप्रेमी व सरपंच सिक्वेरा समर्थकात बाचाबाची झाली. एकमेकांवर काचेच्या बाटल्या फेकण्याचा प्रकारही घडला. यावेळी अधीक्षक निधीन वाल्सन, उपअधीक्षक जिवबा दळवी, विश्वेश कर्पे, निरीक्षक परेश नाईक, अनंत गावकर यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बार्देश तालुक्याचे मामलेदार प्रवीण गावस उपस्थित होते.
घडी व्यवस्थित बसविण्याचा प्रयत्न करु : लोबो
आमदार मायकल लोबो म्हणाले की, दगडफेक करू नका, सर्वांनी शांतता पाळावी. हिंसाचारातून काहीच साध्य होणार नाही. घडी व्यवस्थित बसण्याचा प्रयत्न केला जाईल. गोवा राज्य हे शांतता प्रिय राज्य मानले जात असल्याने अशावेळी शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याची गरज आहे, असेही लोबो म्हणाले.
… तर महाराजांचा पुतळा का नको? : राजीव झा
केसरिया हिंदू वाहिनीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजीव झा म्हणाले की, कळंगूट परिसरात रोनाल्डो, जॅक सिक्वेरा यांचे पुतळे उभारले जाऊ शकतात, मग छत्रपती शिवाजी महाराजांचा का नाही? घडलेल्या प्रकारातून सरपंचांनी जाहीर माफी मागावी व आपल्या पदाचा राजीनामा सादर करावा, असे ते म्हणाले.
बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई का नाही?
कळंगूट परिसरात अनेक बेकायदेशीर बांधकामे उभारण्यात आली आहेत. त्यांवर पंचायतीकडून कारवाई केली जात नाही, तर मग शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरच कारवाई का? असा सवाल आंदोलक यावेळी करत होते.
सकाळपासून मोठा पोलीस फौजफाटा
सकाळी 10 वा. कळंगूट पोलीस निरीक्षक परेश नाईक आपल्या मोजक्याच पोलिसांसमवेत एक महिला उपनिरीक्षक व दोन महिला शिपायांसह पंचायतीजवळ उपस्थित होते. हळूहळू शिवप्रेमीची संख्या वाढू लागल्याने व शिवप्रेमीचा आक्रोश पाहून अन्य पोलिसांना बोलावून घेण्यात आले. म्हापसाचे निरीक्षक सिताकांत नायक, हणजूणचे निरीक्षक प्रशल देसाई, पर्वरीचे निरीक्षक अनंत गावकर, डिचोलीचे निरीक्षक सुरज गावस, उपअधीक्षक विश्वास कर्पे तसेच नंतर उत्तर गोवा अधीक्षक निधीन वाल्सन, अधीक्षक राजू राऊत देसाई, राजेश कुमार आदी घटनास्थळी दाखल झाले. दुपारी 12 वाजले तरी सरपंच पंचायत कार्यालयातून बाहेर येत नसल्याचे पाहून शिवप्रेमी संतप्त झाले होते. जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाम मांडून होते. आंदोलकांनी पंचायतीसमोर छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणानी परिसर दणाणून सोडला. पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन, उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि सरपंच जोसेफ सिक्वेरा बाहेर आले, त्यावेळी शिवप्रेमींनी त्यांच्या हुर्यो उडविल्या.
सरपंच, सचिवाच्या गाड्यांची तोडफोड
पोलीस आणि शिवप्रेमी यांच्यामध्ये झालेल्या झटापटीत जमावाने सरपंच जोसेफ सिक्वेरा यांच्या निसन कार जीए-03-एच-8337 आणि पंचायत सचिव वेळीप यांच्या जीए-09 डी- 7224 या कारचा दर्शनी व मागच्या आरशाच्या काचा दगड घालून फोडल्या. पंचायतीच्या नामफलकावर तसेच आरशावर दगडफेक केल्याने तेथील दर्शनी भागाचा आरसा पूर्णत: फुटला. यावेळी काही पोलीस जखमी झाले.
पोलिसांकडून सिक्वेराच्या समर्थकांना चोप
सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान जोसेफ सिक्वेरा यांचे 8 समर्थक पंचायतीसमोर दाखल झाले. यावेळी कार्यालयाचे शटर बंद होते. आमच्या सरपंचाना कोण हात लावतो ते पाहू असे म्हणत ते आठहीजण पंचायतीच्या बंद शटरसमोर उभे राहिले असता शिवप्रेमींनी त्यांच्यावर आक्रमण करीत बाटल्यांचा मारा केला. यावेळी धक्काबुक्कीही होऊन काहीना मारहाण करण्यात आली. मारी नामक इसमास पोलिसांनी आपल्या दंडुक्याचा हिसका दाखवत बराच चोप दिला.