The Palace of Sawantwadi Sansthan experienced Shivakal; Organizing a martial arts demonstration
तलवारीचे आवाज, डोळयाचे पाते लवते न लवते तोच होणारे दांडपट्टयाचे चौफेर वार आणि लाठ्याकाठ्यांच्या आवाजांनी सावंतवाडीच्या संस्थानच्या राजवाड्याने शिवकाल अनुभवला. निमित्त होते अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग व सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवकालीन युध्दकला प्रात्यक्षिकाचे.
सावंतवाडी संस्थानच्या राजवाड्यात पारंपरिक मावळयांच्या वेशभूषेतील विद्यार्थी आणि नऊवारी नेसून अफलातून संगीनी (तलवार) चालविणाऱ्या महिला, मुलींनी जणू राजवाड्याचे प्रांगण शिवकाल अनुभवत होते. प्रत्येक शस्त्र आणि अस्त्रा मागचा इतिहास ते चालविण्याची पध्दत, ऐतिहासिक संदर्भ विशद करत प्रत्यक्ष ते शस्त्र चालवून दाखवत मावळयांन मधून शिवरायांनी उभ्या केलेल्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला. फिरगोजी शिंदे आखाडा कोल्हापूरचे वस्ताद प्रमोद पाटील, शिवराय पाटील यांनी युध्दकलेची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंतभोसले होते. प्रमुख अतिथी राणीसाहेब शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोसले, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पई, अभिनव फाऊंडेशनचे संस्थापक ओंकार तुळसुलकर, युवा व्यावसायिक प्रतिक बांदेकर उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी