वृत्तसंस्था/ कोची
पंतप्रधान मोदींना धमकीचे पत्र लिहिणाऱ्या आरोपीला पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. झेवियर असे या व्यक्तीचे नाव आहे. एर्नाकुलममधील कथरीकाडावू येथील रहिवासी असलेल्या झेवियरला पोलिसांनी त्याच्या हस्ताक्षराची पडताळणी केल्यानंतर ताब्यात घेतले. झेवियर याने केरळ भाजपचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांना जीवे मारण्याची धमकी देत मोदींची अवस्था राजीव गांधींसारखी होईल, असा इशारा दिला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारपासून केरळच्या दोन दिवसीय दौऱ्यावर कोचीला जात आहेत. या दौऱ्यापूर्वी पंतप्रधानांना धमकी देण्यात आली होती. धमकीचे पत्र मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधिताचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली होती. त्यानुसार पंतप्रधानांविरोधात धमकीचे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. वैयक्तिक वैमनस्यातून शेजाऱ्याला अडकवण्यासाठी झेवियर नामक व्यक्तीने धमकीचे पत्र लिहिल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाल्याचे कोचीचे पोलीस आयुक्त सेतु रमण यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान कोचीला पोहोचण्यापूर्वी येथे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.