पाळीव प्राण्यांचा लळा काही वेगळय़ाच प्रकारचा असतो. विशेषतः श्वान किंवा कुत्रा मानवाच्या घरचा एक सदस्य बनून कित्येकदा राहतो. त्याचा मालक आणि मालकाचे कुटुंबीय त्याच्यावर निरतिशय प्रेम करतात. कुत्र्यानेही आपले सर्वस्व मालकाला प्रदान केलेले असते. स्वार्थीपणाची भावना कुत्र्यात अत्यंत कमी प्रमाणात असते. त्यामुळे तो पाळला जातो. वेळप्रसंगी मालकासाठी कुत्र्याने स्वतःचा जीव दिल्याच्याही घटना नव्या नाहीत. त्यामुळे कुत्र्याला कुटुंबात चांगला मानसन्मान दिला जातो. त्याचे लाडही केले जातात. इतकेच नव्हे तर अमेरिकेतील काही श्वानप्रेमींनी आपली मालमत्ताही आपल्या नातेवाईकांच्या नव्हे तर श्वानांच्या नावे केलेली आहे. श्वानप्रेमाची ही उदाहरणे आपल्या परिचयाची आहेत.
तथापि, सध्या एक व्हिडिओ असा लोकप्रिय झालेला आहे, की ज्यात मालकाने आपल्या कुत्र्याचे शाही थाटमाटात लग्न लावल्याचे दिसून येते. लग्नानंतर या श्वान दांपत्याची वरातही धुमधडाक्मयात काढण्यात आली आहे. लग्नासाठी शेकडोंच्या संख्येने परिचित आणि गावकऱयांना आमंत्रण दिले गेले होते. त्यांच्यासाठी सुग्रास भोजनाचीही व्यवस्था लग्नानंतर करण्यात आली होती. लग्न शुभमुहूर्त पाहून आंतरपाट धरून मंत्रोच्चारात आणि अक्षता टाकून लावले गेले. मंगलमय प्रसंगात होते तसे सनई वादन, बँडबाजा इत्यादींचीही सोय होती. श्वानवधूला दागिन्यांनी मढवण्यातही आले होते. या लग्नाला आलेली वऱहाडी मंडळी चांगली नटूनथटून होती. तसेच त्यांनी भेटवस्तूही आणल्या होत्या. हा व्हिडिओ नेमका कोणत्या गावातील आहे, हे स्पष्ट होत नसले तरी त्याची चर्चा मात्र खूप होत आहे. ‘समर्थाघरचा श्वान’ असा वाकप्रचार आपल्याकडे रुढ आहे. त्याचे प्रत्यंतर आणून देणारा हा विवाह सोहळा असल्याचे दिसून येते.