Karnataka Asembly Election : 10 मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभेच्या एकूण 224 पैकी 189 जागांसाठी सत्ताधारी भाजपने मंगळवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना भाजपने मंगळवारी तब्बल 52 नवीन तिकिट दिले आहे. तर 90 विद्यमान आमदारांना कायम ठेवले. या यादिमध्ये 2019 मध्ये कॉंग्रेस आणि जेडिएसमधून फुटून येऊन सत्तास्थापनेत महत्वपुर्ण भुमिका बजावलेल्या 11 आमदारांचा समावेश आहे.
दक्षिण भारतातील एक महत्वाचे राज्य असलेल्या कर्नाटकमध्ये भाजप सावधगिरी पाऊल टाकत आहे. कर्नाटक हे दक्षिण भारतातील एकमेव असे राज्य आहे जिथे भाजपचे सरकार आहे. गेल्या 40 वर्षापासून सत्ताधारी पुन्हा सत्तेवर न आल्याचा कर्नाटकचा अनोखा इतिहास आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना त्यांच्या पारंपरिक शिगाव मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचा मुलगा बी. वाय. विजयेंद्र आपल्या वडिलांच्या शिकारीपुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवी हे चिक्कमगलुरू मतदारसंघातून तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के शिवकुमार यांच्याविरुद्ध कनकापुरा मतदारसंघातून राज्यमंत्री आर. अशोक निवडणूक लढवणार आहेत. कर्नाटकचे गृहनिर्माण मंत्री व्ही. सोमन्ना वरुणा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आव्हान देणार आहेत. तर चन्नापटना येथून माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या विरोधात सीपी योगेश्वर यांना उतरवण्यात आले आहे
वरुणा मतदारसंघात काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्या विरोधात लिंगायत नेते आणि विद्यमान मंत्री व्ही. सोमन्ना यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या दोन्ही उमेदवारांना सामोरे जाण्यासाठी भाजपने विषेश चक्रव्ह्युव आखले आहे. सोमन्ना हे चामराजनगरमधूनही निवडणूक लढवतील.