छायाचित्रे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून प्रसिद्ध ः अन्य निर्मितीकार्यही वेगाने पूर्ततेकडे, सिंहद्वार लवकरच सज्ज होणार
अयोध्या / वृत्तसंस्था
अयोध्येतील रामजन्मभूमीच्या स्थानी निर्माण केल्या जात असलेल्या भव्य राममंदिराचे गर्भगृह आता 70 टक्के पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे या मंदिराचा तळमजला आता जवळपास पूर्ण झाला आहे. रामलल्लाच्या गर्भगृहापर्यंत पोहचण्यासाठी 32 पायऱयांचे निर्माणकार्य केले जाणार आहे. त्यांच्यापैकी 24 पायऱया पूर्ण झाल्या आहेत. या सर्व निर्माणकार्याची छायाचित्रे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ही छायाचित्रे न्यासाचे महासचिव चंपतराय यांनी शुक्रवारी प्रसिद्ध केली. राम मंदीर आता आकाराला येऊ लागले असून पूर्वनिर्धारित काळात ते पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राममंदिराच्या गर्भगृहाला तीन दिशांना दरवाजे असतील. गर्भगृहाची चौकट आणि 20 फूट उंचीच्या भिंती आता आकाराला येत आहेत. तसेच सिंहद्वार आणि 200 खांबांचे निर्माण कार्यही होत आले आहे. लवकरच गर्भगृहाच्या तुळईच्या निर्माणकार्याला प्रारंभ केला जात आहे. या तुळईची निर्मिती रामसेवकपुरम आणि रामघाट येथील कार्यशाळांमध्ये होत आहे. तसेच 200 स्तंभांवरील नक्षीकामही आता पूर्ण होत आले आहे. तळमजल्याचे जे दगड सज्ज करण्यात आले आहेत, ते आता निर्मितीकार्याच्या स्थानी पोहचविण्यात आले आहेत.
रामलल्ला लवकरच विराजमान
गर्भगृहात लवकरच रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. ती झाल्यानंतर निर्माणकार्याचा मुख्य भाग पूर्ण झाला असे मानण्यात येईल. केवळ भारतातीलच नव्हे, तर अखिल जगातील हिंदू समाज ज्या क्षणाची गेल्या शेकडो वर्षांपासून आतुरतेने प्रतीक्षा करीत होता, तो ऐतिहासिक क्षण आता नजीक आला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. श्री प्रभू रामचंद्रांच्या बालस्वरुपातील रामलल्लाची मूर्ती लवकरच समारंभपूर्वक गर्भगृहात विराजमान करण्यात येणार आहे. या समारंभाची सज्जता वेगाने केली जात आहे, अशी माहिती देण्यात आली.
दानपात्रही भरले
जसजसा राममंदिराला आकार येत आहे, तसे दानपात्रही भरत चालले आहे. भारतातून, तसेच जगभरातून असंख्य रामभक्त या मंदिराच्या निर्माण कार्यासाठी मोठय़ा प्रमाणात अर्थसाहाय्य करीत आहेत. दानपात्रात प्रतिदिन इतक्या नोटा जमा होत आहेत, की त्यांची गणना करण्यासाठी बँकेच्या अनेक कर्मचाऱयांना काम करावे लागत आहे. दानपात्रात प्रतिमाह 1 कोटी रुपयांहून अधिक धन जमा होत आहे, अशी माहिती कार्यालय प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी दिली आहे.
पंतप्रधान मोदी करणार स्थापना
पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी धर्मनगरी अयोध्येतील या भव्य राममंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना करणार आहेत, अशीही माहिती देण्यात येत आहे. ही स्थापना झाल्यानंतर त्वरीत या मंदिरात सर्वसामान्यांना प्रवेश देण्याच्या प्रक्रियेचा प्रारंभ करण्यात येईल. या वृत्तामुळे अयोध्या नगरीत मोठाच उत्साह संचारला आहे. सर्वसामान्य भाविकांप्रमाणेच साधुसंतही आता या समारंभाची प्रतीक्षा आतापासूनच करु लागले आहेत.
राममूर्ती कशी असेल?
रामलल्लाची मूर्ती कोणत्या पाषाणाची करावी, यासाठी देशातील ख्यातकीर्त मूर्तीकार संशोधन आणि प्रयोग करीत आहेत. यासाठी नेपाळमधील गंडक नदी, तसेच राजस्थान आणि कर्नाटकातील अनेक प्रकारचे पाषाण अयोध्येत आणण्यात आले आहेत. त्यांचे परीक्षण करण्यात येत आहे. रामलल्लाची मूर्ती नीलांबुज श्यामल कोमलंगमच्या धर्तीवर असेल, अशीही माहिती आहे. या मूर्तीसंबंधीही रामभक्तांमध्ये मोठी उत्सुकता असल्याचे दिसत आहे.