जागतिक बाजारही सुस्तच ः बँकिंग, आयटी कंपन्या तोटय़ात
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी जागतिक नकारात्मक वातावरणामुळे भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स, निफ्टी दोन्हीही निर्देशांक हे घसरणीसह बंद झाल्याचे पाहायला मिळाले. यात टाटा स्टील, एशियन पेंटस् यांचे समभाग हे सर्वाधिक नुकसानीत होते. बाजारात विक्रीवर अधिक जोर दिसून आला होता. बँकिंग आणि आयटी कंपन्यांचे समभाग नुकसानीत राहिल्याचे दिसून आले.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 872 अंकांच्या घसरणीसह 58,773.87 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 267 अंकांच्या नुकसानीसह 17490.70 अंकांवर बंद झाला होता.
सेन्सेक्समध्ये 1500 अंकांची घसरण
जागतिक बाजारात सोमवारी अनेक बाजार हे घसरणीसह व्यवहार करत होते. त्याचा नकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसला. दरम्यान दोन सलग सत्रात बाजार घसरणीत राहिला असून सेन्सेक्स 1500 अंकांनी तर निफ्टी 465 अंकांनी खाली आला आहे. शुक्रवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला होता.
शेअर बाजारात पोलाद उत्पादक कंपनी टाटा स्टीलचा समभाग सर्वाधिक 4 टक्के घसरणीत होता. यासोबत एशियन पेंटस्, विप्रो, एल अँड टी, बजाज ट्वीन्स, अल्ट्राटेक सिमेंट, ऍक्सिस बँक, सन फार्मा, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक व एसबीआय यांचे समभाग जवळपास 2 ते 3.5 टक्के इतके घसरले आहेत. तर आयटीसी, नेस्ले इंडिया यांचे समभाग मात्र सोमवारी तेजी राखून होते.
दुसरीकडे व्याजदर वाढीच्या भीतीमुळे युरोपियन बाजार काहीसे दबावात व्यवहार करत होते. अमेरिकेतील बाजारही काहीसे सुस्तावलेले दिसले. नॅसडॅक निर्देशांक 260 अंकांनी घसरणीत होता. आशियाई बाजारात शांघाई कम्पोझीट तेजीत होता तर निक्की 135 अंक, हँगसेंग 116 व कोस्पी 30 अंकांनी घसरणीसह व्यवहार करत होते.