अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये रुद्राभिषेक-विधिवत पूजा : पहाटेपासूनच भाविकांची गर्दी
प्रतिनिधी /बेळगाव
पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त शहरातील शिवालये भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. दक्षिण काशी समजल्या जाणाऱया कपिलेश्वर मंदिरामध्ये पहाटेपासूनच विविध धार्मिक विधी पार पडले. दुपारी बारा वाजता विशेष होम आणि अभिषेक करण्यात आला. भाविकांनी यावेळी आवर्जून उपस्थिती लावली तसेच मिलिटरी महादेव, बिस्किट महादेव, वीरभद्र देवस्थान, मल्लिकार्जुन देवस्थान वडगाव यासह सर्वच शिवमंदिरांमध्ये विविध धार्मिक विधी पार पडले. दरम्यान, सर्व शिवमंदिरांच्या प्रवेशद्वारापाशी बेल, फुले, पत्री यांची विक्री तेजीने झाली. त्यामुळे विपेते आनंदित झाले. कोरोनानंतर प्रथमच श्रावण सोमवार खुलेपणाने साजरा करता येणार असल्याने सर्वच मंदिरांमध्ये रात्रीपर्यंत गर्दी होती.
रविवारी रात्री बारापासून पंचामृत अभिषेक करण्यात आला होता. पहाटे पाच वाजेपर्यंत पंचामृत अभिषेक चालला. त्यानंतर श्रावण सोमवारनिमित्त विशेष रुद्राभिषेक करण्यात आला. तसेच त्रिकाल पूजेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी पालखी प्रदक्षिणा करून महाआरती करण्यात आली.
पवित्र श्रावणातील पहिल्या सोमवारी शहर आणि परिसरातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची एकच गर्दी झाली होती. श्रावण सोमवारनिमित्त शहरातील शिवमंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासूनच मंदिरात रुद्राभिषेक, लघुरुद्राभिषेक, पंचामृताभिषेक, महाआरती, पूजन आणि दर्शनासाठी भाविकांची लागलेली रांग असे चित्र दिसून आले.
श्रावण सोमवारनिमित्त कॅम्प येथील बिस्किट महादेव-महादेव शंभू जत्ती मंदिरात अभिषेक, पुष्पालंकार पूजन आदी कार्यक्रम झाले. महादेव गल्ली येथील पुरातन देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री उमा रामेश्वर मंदिरात श्रावण सोमवारी रुद्राभिषेक सुरू होता. याचबरोबर शहर आणि परिसरात मोठय़ा भक्तिभावाने पहिला श्रावण सोमवार पार पडला.
मल्लिकार्जुन देवस्थान-वडगाव
चावडी गल्ली-वडगाव येथील मल्लिकार्जुन देवस्थान पुरातन असून दरवषीप्रमाणे यंदाही मंदिरात श्रावण सोमवारनिमित्त विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांच्यावतीने विशेष पूजा बांधण्यात आली होती. तर पहाटे भाविकांच्यावतीने रुद्राभिषेक घालण्यात आला. सकाळपासूनच दिवसभर वडगावसह भारतनगर, खासबाग आदी भागातील शिवभक्तांनी मंदिरात दर्शन घेतले.