लांजा पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद
लांजा प्रतिनिधी
लांजात कुरियर डिलीव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या तीस वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि.२५ ऑगस्ट रोजी सकाळी ७.४५ वाजता लांजा येथे घडली.
पोलीसांनी दिलेल्या अधिक माहीतीनुसार, अक्षय चंद्रकांत माजळकर (वय ३०, मुळ रा.माजळ, माजळकरवाडी, ता.लांजा व सध्या राहणार शेट्येवाडी, लांजा) हा लांजा येथे ईकाॅम एक्सप्रेस या कुरियर कंपनीत कुरियर डिलीव्हरी बॉय म्हणून कामाला होता. शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अक्षय याच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्याची पत्नी अमृता अक्षय माजळकर (वय २५) आणि चुलत भाऊ हिराचंद मनोहर माजळकर (वय ४५) यांनी त्याला लांजा येथील एका खासगी रुग्णालयात सकाळी ७.१५ वाजता दाखल केले. दरम्यान, उपचार सुरू असतानाच ७.४५ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अक्षय याचे निधन झाले.
याबाबतची खबर त्याचा चुलत भाऊ हिराचंद मनोहर माजळकर ( वय ४५, मुळ रा.माजळ, मधलीवाडी, ता.लांजा व सध्या राहणार शेट्येवाडी, लांजा) याने लांजा पोलिसांना दिली. याबाबत लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे हे करत आहेत.