संदीप वालावलकर यांचे उद्गार
वार्ताहर /माशेल
माशेल सम्राट क्लबची स्थापना झाल्यापासून ‘वारसा शास्त्रीय संगीता’चा हा सांगीतिक कार्यक्रम दर महिन्याला सादर होत असतो. नवोदीत कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे हा सम्राट क्लबचा त्यामागील स्त्युत्य प्रयत्न आहे. सध्याची तरुणाई पाश्चात्य संगीताकडे न वळता भारतीय शास्त्रीय संगीताची त्यांना गोडी लागली पाहिजे, असे प्रतिपादन संदीप वालावलकर यांनी केले.
सम्राट क्लब माशेल व महाशाला कला संगम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘वारसा शास्त्रीय संगीताचा’ या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या संकल्पनेबद्दल शास्त्रीय गायिका सौ. प्रचला आमोणकर व पं. तुळशीदास नावेलकर यांचे त्यांनी अभिनंदन केले. व्यासपीठावर योगेश रायकर, गायिका प्रचला आमोणकर, पं. तुळशीदास नावेलकर, अध्यक्ष अनिता रायकर, मंगेश गावकर हे उपस्थित होते. प्रचला आमोणकर यांनी वारसा उपक्रमामागील उद्देश सांगितला.
त्यानंतर श्रृती सालेलकर, रुपेश गांवस यांचे शास्त्रीय गायन, मोहनदास भगत यांचे बासुरीवादन, गौतमी खांडेपारकर यांचे भरतनाटय़म सादरीकरण झाले. त्यांना पं. तुळशीदास नावेलकर व मिलिंद परब यांनी तबल्यावर, तर गोपाळ प्रभू यांनी संवादिनीवर साथ केली. सूत्रसंचालन मनोज कारापूरकर यांनी तर मंगेश गावकर यांनी आभार मानले.