पुणे / प्रतिनिधी :
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टतर्फे 131 व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. जय गणेश प्रांगणाच्या पारंपरिक जागेत उत्सवमंडपात श्रींची मूर्ती विराजमान होणार असून भाविकांना श्रींसोबतच अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचेदेखील दर्शन होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात सजावटीचा शुभारंभ सोहळा व पूजन कलादिग्दर्शक अमन विधाते यांच्या हस्ते झाले. मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार 125 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 100 फूट उंच असणार आहे. लाकूड, बॅटम, प्लायवूड आदी साहित्य वापरून त्यानंतर रंगकाम करण्यात येणार आहे. तसेच शेवटच्या टप्प्यात त्यावर दिवेदेखील बसविण्यात येणार आहेत. प्रतिकृतीमध्ये 24 खांब व 24 कमानी उभारण्यात येणार आहेत. मंदिराचा मुख्य घुमट 100 फुटांपेक्षा उंच असून ध्वजासहित सुमारे 108 फूट उंच मंदिर असेल. याशिवाय मंदिराचे छोटे आणि मोठे असे रेखीव 11 कळस असणार आहेत.
मुख्य सभागृहात श्री गणरायाचे मखर सोनेरी रंगाच्या छटांमध्ये असून सभोवती सुशोभित कमानी असणार आहेत. मंदिर परिसर व मार्गामध्ये रामायणातील घटनांचा आढावा चित्र व लेखन स्वरुपात मांडण्यात येणार आहे. बेलबाग चौकातून प्रवेश करताना काल्पनिक रामसेतू उभारण्यात येणार आहे. तेथून भाविकांना मंदिरात प्रवेश करता येईल, हेदेखील यंदाचे आकर्षण असेल. याशिवाय भगवान श्रीराम, प्रवेशद्वारावर श्री हनुमंत आणि वानरसेनेच्या वानरांच्या प्रतिकृतीदेखील लक्षवेधी ठरणार आहेत.
सजावट विभागात 100 कारागिर दिवस-रात्र सलग 75 दिवस कार्यरत राहणार आहेत. मंदिराची प्रतिकृती फायबरमध्ये उभारण्यात येणार असून त्यावर रंगकाम करण्यात येईल. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना आणखी सुटसुटीत करण्यात येत असून यामुळे भाविकांना लांबूनदेखील सहजतेने श्रींचे दर्शन घेणे शक्य होणार आहे. कलादिग्दर्शक अमन विधाते हे मंदिराचे काम, विद्युतरोषणाईचे काम वाईकर बंधू, तर मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.