ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याच्या प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टने विसर्जन मिरवणुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यंदा दगडूशेठ गणपती दुपारी 4 वाजता विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार आहे.
दरवर्षी दगडूशेठ गणपतीला विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी वेळ वाढत होता. मागील वर्षी सकाळी 7.45 वाजता बाप्पांचे बेलबाग चौकात बाप्पांचे आगमन झाले. त्यामुळे दर्शनासाठी उभ्या असलेल्या भाविकांचे हाल होतात. मागील अनेक वर्षे दगडूशेठ गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे रात्री लक्ष्मी रस्त्यावर पोलीस प्रशासनाने मार्ग उपलब्ध करून दिल्यावर सहभागी होत असतात. मात्र, त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी संपूर्ण रात्र वाट पाहावी लागते. भाविकांच्या भावनांचा विचार करून दगडूशेठ गणपती ट्रस्टने यंदा दुपारी 4 वाजता बाप्पांना विसर्जन मिरवणुकीत सहभागी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने 131 व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.