हर हर महादेवाचा गजर : नंदगडमधील रथोत्सवासाठी दावणगिरीहून मागवल्या खास फुलांच्या माळा
वार्ताहर /खानापूर
नंदगड व परिसरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत विरक्त मठाचा रथोत्सव पार पडला. यावेळी हर हर महादेवाचा गजर भाविकांकडून होत होता. शांततेत व सुव्यवस्थेत रथोत्सव पार पडला.
शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता नंदगड गावातील नागरिक मठासमोरील रथाजवळ जमा झाले. मठाचे उत्तराधिकारी चन्नवीर देवरू यांच्या हस्ते मठाचे पूजन झाले. यानंतर गावातील 21 हक्कदारांनी श्रीफळ वाढवले. तसेच विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी श्रीफळ वाढवले. त्यानंतर रथोत्सवाला सुरुवात झाली. दगडी चाके असलेला लाकडी रथ फुलांच्या मळानी सजवण्यात आला होता. यासाठी फुलांच्या माळा बनवणारे दावणगेरीहून खास लोक आणण्यात आले होते. त्यांनी आकर्षक माळा बनविल्या होत्या. मठाचे भाविक मोहन हिरेमठ यांनी फुलांच्या माळा सजवण्याचा सर्व खर्च उचलला होता.
आंबोत्या व केळीच्या झाडांचे रोप रथाला बांधले होते. रथावर थांबलेल्या मान्यवरांच्या सूचनेनुसार रथ ओढण्यात येत होता. रथ ओढण्यासाठी दोन्ही बाजूला लांब दोर बांधण्यात आले होते. त्यांच्या साहाय्याने रथ ओढला जात होता. रथाचे वजन व उंची अधिक होती. रथ जसा जसा पुढे जात होता तसे रथावर खडीसाखर, खारीक, केळी भाविकांकडून उडविण्यात येत होती. मठापासून नियोजित स्थळापर्यंत रथ ओढण्यात आला. रथोत्सवानिमित हिरेमुनवळीचे प्रभू शिवलिंग शिवाचार्य स्वामीं, चिक्कमुनवळीचे शिवपुत्र स्वामी, आरळीकट्टी मठाचे शिवमूर्ती स्वामी, आवरोळी मठाचे चन्नबसवदेवरू स्वामी, देवरशिगेहळी मठाचे वीरेश्वर स्वामी, कुळवणी मठाचे मल्लिकार्जुन स्वामी उपस्थित होते. वरील स्वामीजींनी रथोत्सवापूर्वी मार्गदर्शन केले. रथोत्सवाला आबालवृद्धांसह महिलांची संख्या लक्षणीय होती.
रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम
रात्री 9 वाजता श्री गुरु राघवेंद्र मेलोडीज गोकाक फॉल्स यांचा आर्केस्ट्रा व त्यानंतर भजनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमालाही मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती.
चन्नवीर स्वामींच्या पिठाला दर्शनासाठी गर्दी
गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या विरक्त मठाच्या यात्रेला अनेक भाविकांनी उपस्थिती दर्शवून त्यांनी चन्नवीर स्वामींच्या पिठाचे दर्शन घेतले. शुक्रवारी रथोत्सव असल्याने सकाळपासूनच मठाच्या परिसरात गर्दी झाली होती. रथोस्तवा नंतर ही भाविकांनी दर्शन घेतले.