अल-कायदाच्या इशाऱयानंतर मंदिराच्या सुरक्षेत वाढ ः हिंदू नेतेही टार्गेटवर
@ अहमदाबाद / वृत्तसंस्था
गुजरातमधील द्वारका येथील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरावर अल-कायदा या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची धमकी दिली आहे. या धमकीनंतर मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राज्य सरकार, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. मंदिराकडे येणाऱया प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर शहरातील प्रत्येक बस आणि रेल्वे स्थानकावरही पथकाची करडी नजर आहे. आता द्वारका मंदिराला त्रिस्तरीय सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. तसेच येथे येणाऱया भाविकांना मंदिरात कोणत्याही प्रकारचे सामान नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अल कायदाच्या नेत्याच्या धमकीनंतर आणि गुप्तचर विभागाच्या इनपुटनंतर गुजरात सरकार अलर्ट मोडमध्ये आले असून द्वारकाधीश मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याठिकाणी आता पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवण्यात येणार आहे. द्वारका जिल्हा तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला असून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. समुद्रमार्गे हल्ला होण्याचा धोका विचारात घेऊन नौदलाला सतर्क करण्यात आले आहे.
नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर सध्या देशभरात आंदोलन आणि निदर्शने सुरू आहेत. याचदरम्यान अल कायदाकडून मंदिरावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. दहशतवादी संघटना अल कायदाने आपल्या संदेशात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा अपमान करणाऱयांविरोधात इशारा दिला आहे. देशातील अनेक राज्यात हिंदू कार्यकर्त्यांना टार्गेट केले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर गुजरातबरोबरच उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत दहशतवादी आत्मघाती हल्ले करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्याचबरोबर नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी आपल्या संदेशात उल्लेख केला आहे.
नुपूर शर्मा यांनी अलीकडेच एका टीव्ही चॅनेलवरील चर्चेत प्रेषित मोहम्मद यांच्यावर कथित चिथावणीखोर वक्तव्य केले होते. यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. इस्लामिक देशांमध्येही नाराजी आणि निषेध सुरू आहे. भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले आहे. कोणत्याही पंथाचा किंवा धर्माचा अपमान करणाऱया विचारसरणीच्या विरोधात भाजपने एक निवेदन जारी केले. मात्र, भाजप नेत्यांच्या वक्तव्यावरून गदारोळ सुरूच आहे.