महिलांसमवेत नग्नावस्थेत काढले व्हिडिओ : मारहणीनंतर जिवे मारण्याची धमकी
प्रतिनिधी /म्हापसा
गोव्यात आलेल्या चंदगड तालुक्यातील अकरा पर्यटकांना पाच अज्ञातांनी बेदम मारहाण करून त्यांच्याकडून पैसे व भ्रमणध्वनी तसेच दागिने काढून घेऊन त्यांच्या महिलांसमवेत नग्नावस्थेत व्हिडिओ काढीत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना म्हापसा बोशन होममध्ये असलेल्या पार्लरमध्ये घडली. याबाबत रविवारी दुपारी या अकराही जणांनी लेखी तक्रार दिल्यावर म्हापसा पोलिसांनी रितसर गुन्हा नोंदवून घेतला व तिघा संशयितांना अवघ्या तासाभरात अटक करण्यात यश मिळवले.
याबाबत प्रवीण पांडुरंग पाटील (20 वर्षे, राहणारा नंदावाडे-चंदीगड-कोल्हापूर) याने रितसर तक्रार म्हपसा पालिसांत दाखल केल्यावर म्हापसा पोलिसांनी सचिन भारद्वाज (वय 26, रा. हरियाणा), मुबारक मौर्ला (कळंगूट) व आशिष जागीर सिंग (गोरेगाव-हरयाणा) या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक शोभित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक परेश नाईक यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी तिघाजणांना ताब्यात घेऊन अटक केली असून अन्य महिला व इतर संशयितांच्या शोधात म्हापसा पोलीस आहेत.
एक गोमंतकीय महिला हा मसाज पार्लर चालवित असल्याचे उघडकीस आले असुन तिने तो गेल्या 20 दिवसांपूर्वीच भाडेपट्टीवर दिला होता, अशी माहिती हाती आली असून पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.
खोलीत कोंडून ठेवून लुटले
पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार अकरा तरुण विद्यार्थ्यांचा गट गोव्यात आला होता. बागा येथे आंघोळ केल्यानंतर ते दुपारच्या दरम्यान म्हापसा येथे आले असता देव बोडगेश्वर मंदिराजवळ काही दलालवर्गांनी त्यांना अडविले. त्या पर्यटकांनी येथे जेवण कुठे मिळते असे विचारले असता त्यांना बोशन होमजवळ असलेल्या मसाज पार्लरकरडे नेले व पहिल्या मजल्यावर सर्वांना नेऊन एका खोलीत कोंडून ठेवले. त्यांच्याकडील पैसे, मोबाईल, अंगठय़ा, सोनसाखळी काढून घेतले. इतकेच नव्हे तर तुमच्या नातेवाईकांकडून जी पे करा असे सांगून पैसे दिल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी देत त्यांच्या गळय़ाला सुरी लावून त्यांना लुबाडण्यात आले.
नग्न करून व्हिडिओ तयार केले
ही गोष्ट त्या सर्वांनी समाज कार्यकर्ते ऍड. संतोष मळवीकर यांना सांगितली. तरुण भारतशी बोलताना ऍड. मळवीकर म्हणाले की भयभीत झालेल्या तरुणांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. त्यावर त्यांच्या साथीदारांनी त्यांच्या अन्य चार साथीदारांना बोलावून घेतले. इतक्यात गप्प न बसता गाडीतील तरुणांना डोक्याला तेल लावून घेतले. काही महिला तेथे आल्या व त्यांनी या तरुणांना तेल लावून मसाज केले. त्यांचा व्हिडिओही बनवला. त्यानंतर त्यांची पैशाची मागणी पूर्ण न केल्याने त्यांना बेदम मारहाणही केली. त्यांना नग्न करून महिलांसोबत फोटोही काढले व व्हिडिओही बनवले. या घटनेची माहिती अन्य कोणाला दिल्यास फोटो व व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करून जिवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर त्यांच्याकडून कशीबशी सुटका करून घेत त्या अकराही जणांनी आपले गाव गाठले खरे. मात्र झालेल्या प्रकरणामुळे ते सर्वजण दोन दिवस तणावाखाली होते. अखेर शनिवारी घटनेची माहिती पिडित तरुणांनी आपल्याला दिली असल्याचे ऍड. मळवीकर यांनी सांगितले.
त्यानंतर या घटनेची संपूर्ण माहिती रितसर एका निवेदनाद्वारे समीर शिंदे, समीक्षा आपटेकर, सुभाष गावडे, प्रवीण पाटील, सागर हसरकर यांनी सहय़ा करून चंदगड पोलीस स्थानकात देऊन संरक्षणाची मागणी केली.
मंत्री, पत्रकारांच्या विचारपुशीनंतर पोलीस यंत्रणा सज्ज
भयभीत झालेले अकराही तरुण विद्यार्थ्यांनी आपला गाव गाठला. काय करावे कळेना. अखेर चंदगड पोलीस स्थानकात निवेदन दिल्यावर तेथील स्थानिक वृत्तपत्र व सोशल मिडियावर घटनेची माहिती व्हायरल केली. मात्र याबाबत म्हापसा पोलीस स्थानकात काहीच गुन्हा नोंद नसल्याने म्हापसा पोलीसही संभ्रमात होते. अखेर फोनद्वारे पोलीस निरीक्षकांनी या तरुणांशी संपर्क साधून गोव्यात येऊन तक्रार देण्यास भाग पाडले.
दरम्यान मंत्री गोविंद गावडे तसेच काही पत्रकारांनीही घटनेबाबत निरीक्षकांशी विचारपूस केली असता पालीसही खडबडून जागे झाले व पोलीस यंत्रणा कामाला लागली. चंदगडहून हे तरुण म्हापसा पोलीस स्थानकावर आल्यावर त्यांचे भ्रमणध्वनी संशयित आरोपीकडे असल्याचे समजल्यावर म्हापसा पोलिसांनी लोकेशन ट्रेस करून तिघांना पकडण्यात यश मिळवले. हे तिघेजण म्हापशातच वेगवेगळय़ा ठिकाणी होते.
म्हापसा पोलिसांची कारवाई
म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक परेश नाईक यांनी अधीक्षक सुबीत सक्सेना, उपाधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आपले पोलीस पथक उपनिरीक्षक विराज कोरगावकर, उपनिरीक्षक गौरव नाईक, आशिषश परब, हवालदार सुशांत चोपडेकर, शिपाई राजेश कांदोळकर, प्रकाश पोवळेकर, अक्षय पाटील, आनंद राठोड यांनी ही कारवाई केली.
दलालाचे फोटो ठरले आरोपींना पकडण्यास महत्त्वाचा धागा
राज्यात किनारी भाग तसेच अन्यत्र ठिकाणी जे दलाल आहेत त्या सर्वांचे फोटो काढून ठेवण्यास यापूर्वीच पोलीस अधीक्षक सक्सेना यांनी सर्व पोलीस ठाण्यात आदेश दिला होता. म्हापशातील एका संशयिताचा फोटो निरीक्षक परेश नाईक यांनी या तरुणांना दाखवला असता तोच या घटनेत गुंतल्याचे या तरुणांनी स्पष्ट केले असता तासाभरात पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याने कबुली दिल्यावर अन्य दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. अन्य दोघे व महिला फरारी असून रविवार असल्याने सदर पार्लर बंद होता. म्हापसा पोलिसांनी भादसंच्या कमल 147, 504, 323, 395, 506 (2), रेड व्हीद 34 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.