वृत्तसंस्था/ होबार्ट
आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला शनिवारपासून ऑस्ट्रेलियात प्रारंभ झाला. या स्पर्धेसाठी सुपर 12 संघात दाखल झालेल्या लंकन संघाला दुखापतीची समस्या चांगलीच जाणवत आहे. दरम्यान या संघातील अनेक खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने या समस्येवर मात करण्यासाठी तीन बदली खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
या स्पर्धेतील लंकेचा सलामीचा सामना रविवारी आयर्लंडबरोबर झाला. या सामन्यात लंकेने आयर्लंडचा 9 गडय़ांनी दणदणीत पराभव करून विजयी सलामी दिली. या पहिल्या सामन्यासाठी बदली खेळाडू लंकन संघाने पी. निशांका, असेन बंदारा त्याचप्रमाणे दिलशान मधुशंका यांचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान लंकन संघातील मधुशंका, डी. चमिरा आणि डी. गुणतिलका दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकले नाहीत. लंकन संघातील प्रमोद मधुसेन आणि निशांका यांना किरकोळ दुखापत झाली आहे. यापूर्वी खेळविण्यात आलेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेवेळी लंकन संघातील पाच खेळाडू जखमी झाले होते. त्यामुळे लंकन संघाने राखीव खेळाडूचा कोटा वाढविला आहे. त्यामुळे आता यष्टीरक्षक आणि फलंदाज निरोशन डिक्वेला, वेगवान गोलंदाज असिता फर्नांडो आणि एम. पतीरना हे तातडीने ऑस्ट्रेलियाला रवाना झाले आहेत.