बिहार-उत्तर प्रदेशात सतर्कता ः चौघांना अटक ः जमावात स्फोट घडवण्याचा होता कट
.. मुझफ्फरपूर / वृत्तसंस्था
बिहारमधील मुझफ्फरपूर शहरातील अमली पदार्थ तत्स्कर (ड्रग्ज सप्लायर) जावेद उर्फ सिन्हू याच्या घरातून पोलिसांनी तीन टाईमबॉम्ब जप्त केले आहेत. यानंतर पोलीस आणि एटीएस या दहशतवादी कटाचा संयुक्तपणे तपास करत आहेत. या प्रकरणाचा तपास करताना उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील दोन फेरीवाल्यांसह शमी खान या तरुणालाही ताब्यात घेण्यात आले आहे. बिहार एटीएस त्याची चौकशी करत असून उत्तर प्रदेश एटीएसचे पथकही या सर्व प्रकरणात तपासात सहभागी झाले आहे.
टाईमबॉम्ब हस्तगत केल्यानंतर तपास अधिकाऱयांनी मुझफ्फरपूरचा रहिवासी जावेद याच्यासह उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील दोन तरुणांना अटक केली. हे दोन्ही संशयित फेरीवाले आहेत. जावेदच्या मोबाईलमधून काश्मीरच्या वेगवेगळय़ा ठिकाणचे फोटो सापडले असून त्याची अधिक चौकशी केली जात आहे. त्याच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे तपास अधिकाऱयांची विविध पथके ठिकठिकाणी रवाना झाली आहेत.
तीनकोठिया येथील छाप्यामध्ये दोन ठिकाणी 600 ग्रॅम आणि 100 ग्रॅम स्फोटकांसह 5 रिकामी काडतुसेही सापडली. तसेच 4 मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. पथकाने दुसऱया ठिकाणी शोध घेतला असता एका बॅगेत बॉम्ब आढळून आला. बॅगेत बॉम्ब ठेवून त्याला बांधून ठेवले होते. पोलिसांच्या पथकाने ते उघडले असता 3 बॉम्ब निदर्शनास आले. सदर बॉम्ब टायमरसह इलेक्ट्रॉनिक सर्किटने जोडण्यात आले होते. यातील दोन बॉम्बसोबत डिजिटल घडय़ाळ आणि एकाकडे ऍनालॉग घडय़ाळ होते. वेळ निश्चित करून गजबजलेल्या ठिकाणी स्फोट घडवण्याचा कट यातून स्पष्टपणे दिसून येत आहे. सदर टाईमबॉम्ब तत्काळ निकामी करण्यात आल्याचे मुझफ्फरपूरचे एसएसपी राकेश कुमार यांनी सांगितले.
दहशतवादी कनेक्शनचा तपास
बॉम्बशोधक पथकासह फॉरेन्सिक पथकाच्या प्राथमिक तपासात दहशतवादी कारवायांशी संबंध असण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. यासंबंधी एटीएसला पूर्ण माहिती देण्यात आली आहे. जप्त केलेल्या बॉम्बची मारक क्षमता कमी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अशा स्फोटकांमधून गर्दीच्या ठिकाणी स्फोट होऊन चेंगराचेंगरी आणि हाहाकार माजवण्याचा कट असू शकतो, अशी माहिती तपास यंत्रणांकडून देण्यात आली.