गंभीर आरोप होताच दोघा जणांना अटक : प्रकरणाची चौकशी सुरू
बेळगाव : गांजा विक्रीप्रकरणी ताब्यात घेतलेल्या जोडगोळीची कोणत्याच कारवाईशिवाय सुटका करण्याचा प्रकार टिळकवाडी पोलिसांना महागात पडणार आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून चौकशीअंती संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, गंभीर आरोप होताच बुधवारी ‘त्या’ दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. गोवावेस सर्कलजवळ बुधवारी सकाळी पंचनाम्याचे सोपस्करही पूर्ण करण्यात आले आहे.
28 जानेवारी रोजी रात्री उशिरा गांजासह आरपीडीजवळ दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना पोलीस स्थानकात नेवून काही तासांत कसलीच कारवाई न करता सुटका करण्यात आली. श्रीराम सेना हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत हा मुद्दा मांडला होता. बेळगावला नशामुक्त बनविण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी आपल्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोणत्याही परिस्थितीत गांजा, अफीम, पन्नी विक्री खपवून घेतले जाणार नाही. अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना कायद्याचा हिसका दाखवा, अशी सक्त ताकीद त्यांनी दिली होती.
मात्र गांजाप्रकरणी ताब्यात घेतलेल्यांची कारवाईविना सुटका करण्यात आली आहे. सध्या खडेबाजारचे एसीपी अरुणकुमार कोळ्ळूर यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी सोपविण्यात आली असून चौकशीचा अहवाल उपलब्ध झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. स्वत: अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक अलोककुमार यांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक व दोन पोलिसांवर थेट आरोप करण्यात आला आहे. गांजा विकणाऱ्यांची सुटका केली जात आहे तर याप्रकरणी माहिती देणाऱ्या हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांवर खटले दाखल करण्याचे प्रकार सुरू आहेत, असा गंभीर आरोप रमाकांत कोंडुस्कर यांनी केला होता. त्यानंतर बुधवारी ‘त्या’ जोडगोळीला अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकारीही अंधारात
उपलब्ध माहितीनुसार टिळकवाडी पोलिसांनी पोलीस आयुक्त किंवा इतर अधिकाऱ्यांना यासंबंधी पुसटशी माहितीही दिली नव्हती. पत्रकार परिषदेत आरोप झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. स्टेशन डायरीत उल्लेख करून प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांची सुटका केल्याचे सांगत आता पोलीस अधिकाऱ्यांनी सारवासारव सुरू केली आहे. बेळगावात असे अनेक प्रकार घडले असून अशा प्रकारांमुळे पोलीस दलाची प्रतिमा डागाळत चालली आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या कोणती कारवाई करणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.