शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी व्यक्त केलेले मत
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव शहरातील सांडपाण्याच्या प्रदूषणामुळे साळ नदी मृत पावत आहे यात शंका नाही. पण मडगावचे आमदार गळती न होणारी गटार व्यवस्था उपलब्ध करून देण्यावर भर देण्याऐवजी नाल्याच्या स्वरूपातील सांडपाणी निचरा व्यवस्था बांधण्यासाठी जादा काम करत आहेत याबद्दल शॅडो कौन्सिल फॉर मडगावचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी खेद व्यक्त केला आहे. साळ नदीच्या प्रदूषणाचे स्रोत बंद करण्याच्या बाबतीत यंत्रणा गतिमान करण्यात सरकार आणि अधिकारी हलगर्जीपणा दाखवत असताना, साळ नदी ज्यातून वाहते त्या तिन्ही मतदारसंघांतील जनतेने रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करण्याची वेळ आली आहे., असे कुतिन्हो यांनी म्हटले आहे.
शॅडो कौन्सिल अनेक वर्षांपासून साळ नदीत सोडल्या जाणाऱया दूषित सांडपाण्याचा मुद्दा मांडत आले आहे. साळ नदीच्या प्रदूषणाचे स्रोत बंद न करता 200 कोटी रुपये इतक्या सरकारी निधीची उधळपट्टी करून नदीतील गाळ उपसण्याच्या प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलनही केले होते, असे कुतिन्हो यांनी साळ नदीच्या प्रदूषणाच्या मुद्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले. वस्तुस्थिती अशी आहे की, मडगाव शहरातील सांडपाण्यामुळे साळ नदी प्रदूषित होत असतानाही मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना त्याची काहीच पर्वा नाही असे दिसून येते. त्यांना नदीतील गाळ काढण्याच्या कामात जास्त रस होता असे आम्हाला जाणवलेले आहे, असेही कुतिन्हो यांनी म्हटले आहे.
साळ नदीतील गाळ उपसण्याच्या कामाच्या कंत्राटदाराशी मडगावच्या आमदाराचे कोणते संबंध आहेत आणि मडगावच्या आमदारांना प्रदूषणाचे स्रोत रोखण्याऐवजी नदीतील गाळ काढण्याच्या कामाची अधिक काळजी का आहे, हे बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी शोधणे अधिक रंजक ठरेल. आमदार कामत आणि आमदार व्हिएगस यांनी जुलै, 2022 मध्ये साळ नदीच्या काठावर कुठे तरी एकत्र घेतलेली प्रतिज्ञा लक्षात घेऊन आम्हाला असे म्हणावेसे वाटते, असे कुतिन्हो यांनी यांनी म्हटले आहे. मडगावच्या आमदाराने त्यांच्या जवळपास 3 दशकांच्या कार्यकाळात साळ नदीत वाहणाऱया सांडपाण्याबद्दल कधी चिंता व्यक्त केलेली आहे काय, असा सवाल त्यांनी केला आहे.