कराडच्या सुर्ली घाटातील प्रकार, पोलिसांत गुन्हा दाखल
कराड प्रतिनिधी
एसटी कर्मचाऱयांचा संप अजूनही सुरू असतानाच काही कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. यातच मंगळवारी दुपारी आटपाडी एसटीवर कराडच्या सुर्ली घाटात पाठीमागून दगडफेक झाल्याचा प्रकार घडला. या प्रकाराने प्रवाशांसह चालक व वाहकांची तारांबळ उडाली. मात्र सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप आहेत. दरम्यान एसटीवर दगडफेक करणारांचा पोलीस शोध घेत असून रात्री उशिरापर्यंत कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सांगली जिह्यातील आटपाडी आगारातून एक एसटी प्रवासी भरून कराडकडे येत होती. दुपारी अडीचच्या सुमारास कराडच्या सुर्ली घाटात आल्यावर घाटात बरोबर दुसरे वळण घेताना एसटीवर पाठीमागून जोरात दगडफेक झाली. अचानक दगडफेक झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखत एसटी पुढे वेगाने नेऊन थांबवली. तोपर्यंत दगडफेक करणारे पसार झाले होते. त्यामुळे नेमकी कोणी व कशासाठी दगडफेक केली हे समजू शकले नाही.
दगडफेकीनंतर एसटीत असणारे सर्व 23 प्रवासी सुरक्षित आहेत का? याबाबत चालक व वाहक यांनी खात्री करून प्रवाशांची विचारपूस केली. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी एसटी कराड आगारात आणली. त्यानंतर चालक व वाहक यांनी एसटी तालुका पोलीस ठाण्यात आणली. येथे पोलिसांनी घडल्या प्रकाराची माहिती घेतल्यानंतर नेमकी कोणी व कशासाठी दगडफेक केली याबाबत विचारणा केली असता ते सांगता येत नसल्याचे चालक-वाहक आणि पोलिसांना सांगितले. याबाबत रात्री उशिरापर्यंत कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
अज्ञातांकडून वडूज-डिस्कळ एसटीवर दगडफेक
वडूज ः मंगळवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास वडूज डेपोतून सोडण्यात आलेल्या वडूज-डिस्कळ एसटी बसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱयांनी संप पुकारला आहे. दरम्यान आज वडूज आगारातून सोडण्यात आलेली वडूज-डिस्कळ ही बस आपल्या मार्गावर मार्गस्थ होत असताना दोन अज्ञातांनी दुचाकीवर या गाडीचा पाठलाग करत पुसेगाव हद्दीत या बसवर दगडफेक केली. सुदैवाने यावेळी गाडीत एकही प्रवासी नव्हता, या घटनेत कोणीही जखमी झाले नसून ड्रायव्हर व महिला कंडक्टर सुखरूप आहेत. घटनेबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.