जिल्हाधिकाऱयांची अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची नितांत गरज असते. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू देऊ नका, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आरोग्य विभागाची बैठक घेऊन त्यांनी वरील सूचना केल्या आहेत. खासगी व सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध ठेवा. ऑक्सिजनविना एकही रुग्ण दगावू नये, याची दक्षता प्रत्येकाने घ्या. महत्त्वाचे म्हणजे सध्या ऑक्सिजनची कमतरता नाही. मात्र आपत्कालीन परिस्थितीमध्ये सामना करण्यासाठी ऑक्सिजन गरजेचे आहे. त्या दृष्टीने आताच साठा करून तो योग्यरितीने पुरवठा करा, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
कोल्हापूर तसेच बळ्ळारी जिल्ह्य़ाला बेळगाव जिल्हय़ातून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. आता त्यांच्याकडे ऑक्सिजन उपलब्ध झाल्यानंतर तो परत साठा मागवून घ्या, असे देखील जिल्हाधिकाऱयांनी सांगितले आहे. एकूणच कोणत्याही परिस्थितीत जिल्हय़ामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू नये यासाठी आरोग्य विभागाने दक्षता घ्या, असे त्यांनी यावेळी सांगितले.
साहाय्यक औषध नियंत्रण अधिकारी रघुराम यांना ऑक्सिजन उपलब्ध बाबतची माहिती देण्यात आली आहे. या बैठकीला पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अप्पर जिल्हाधिकारी योगेश्वर, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याचे अधिकारी एस. व्ही. मुन्याळ हे उपस्थित होते.