प्रतिनिधी/ चिपळूण
चिपळुणात आजही गुटखा विक्री होत असल्याचे व संबंधितांवर कारवाई करण्याचे संबधित विभागाचे वृत्त ‘तरूण भारत’मध्ये प्रसिध्द होताच आता व्यावसायिकांनी जागा बदलली आहे. शहरातील खेंड परिसरात गुटखा विक्रीचे नवे केंद्र सुरू करण्यात आले असून कारवाईच्या भीतीने कोडही बदलण्यात आले आहेत.
गेल्या काही वर्षापासून गुटखा विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे. तर सिगारेट व अन्य अंमली पदार्थ विक्रीवर अनेक निर्बंध आहेत. मात्र तरीही बंदी असलेले व नियम, अटी घालून दिलेले सर्वच अंमली पदार्थ खुलेआम विकले जात असल्याचे सर्वत्र सहज दिसून येत आहे. यातूनच काही महिन्यांपूर्वी शहरातील रंगोबा साबळे रोड व सावर्डे बाजारपेठेत पोलिसांनी छापा मारून लाखो रूपयांचा गुटखा साठा जप्त करत या प्रकरणी अनेकांना अटक केली होती. या संशयित आरोपींनी जेलची हवाही खावी लागली आहे. असे असले तरी ते अटक असताना आजही गुटखा विक्री बंद झालेली नाही. सर्वच टपऱया व लहान-मोठय़ा दुकांनामधून गुटख्याची विक्री होत असून कारवाईनंतर दर मात्र वाढले आहेत. ज्यांच्यावर कारवाई झाली आहे, त्यांनी पूर्वीपेक्षा अधिक जोमाने हा व्यवसाय सुरू केला आहे.
या बाबत ‘तरूण भारत’ने काही दिवसापूर्वी सविस्तर वृत्त प्रसिध्द केले होते. तर त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने अशा विक्री करणाऱयांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आता या व्यावसायिकांनी आपली जागा तात्पुरत्या स्वरूपात बदलली आहे. त्यानुसार शहरातील खेंड परिसरात नवे केंद्र सुरू करण्यात आले असून येथे मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत गुटखा घेऊन येणारी मोठी वाहने येत असून याच कालावधीत विक्रीही होत आहे. कारवाईच्या भीतीने ग्राहकांची ओळख पटावी म्हणून गुटख्यासाठी पूर्वी असलेले सर्व कोड बदलण्यात आले असून नवा कोड सांगणाऱयालाच हवा तितका गुटखा दिला जात असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनासह पोलीस संबधित व्यावसायिकांवर कारवाई कधी करणार, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.
.