नवी दिल्ली
पूर्व लडाखमध्ये मागील 9 महिन्यांपासून भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान सुरू असलेला तणाव कमी करण्यासाठी पुन्हा एकदा दोन्ही देशांदरम्यान सैन्य कमांडर स्तरीय बैठक होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान ही नववी बैठक आहे. भारताकडून यंदाच्या चर्चेत काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. मागील काही बैठकांप्रमाणेच यावेळीही विदेश मंत्रालयाचे प्रतिनिधी या बैठकीत सामील होतील.
दोन्ही देशांदरम्यान चुशूल सेक्टरसमोर चीनच्या मोल्डोमध्ये ही बैठक होणार आहे. यापूर्वी दोन्ही देशांमधील अखेरची सैन्यस्तरीय बैठक 6 नोव्हेंबर रोजी पार पडली होती. सुमारे साडेतीन महिन्यांपूर्वी भारतीय सैनिकांनी पूर्व लडाखमध्ये पँगोंग सरोवरच्या दक्षिण काठावर सामरिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण मुखपरी, रेचिन ला आणि मगर हिल भागातील अनेक उंच ठिकाणांवर नियंत्रण मिळविले होते. भारतीय सैन्याने ही कारवाई 29-30 ऑगस्टदरम्यान रात्री पीपल्स लिबरेशन आर्मीकडून धमकाविण्याच्या प्रयत्नानंतर केली होती. चीनच्या सैनिकांनी एप्रिलपूर्वीच्या स्थितीत परतावे असे भारताने ठणकावून सांगितले आहे. तर चीन भारतीय सैनिकांना मागे घेण्याची मागणी करत आहे.