वार्ताहर / व्हनाळी
धर्मवीर संभाजी महाराज,लोकराजा छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्या घराण्याचा वारसा लाभलेल्या विद्यमान खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टिका करणार्याा गुणरत्न सदावर्ते यांचा जाहिर निषेध करत असल्याचे मत शिवसेनेचे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी व्यक्त केले. मराठा आरक्षणाच्या चर्चेदरम्यान गुणरत्ने यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यावर केलेल्या टिकेचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रात उमटत असताना संजय घाटगे यांनी व्हनाळी ता कागल येथे पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त केला.
घाटगे म्हणाले की, खासदार संभाजीराजे सर्वच जाती धर्माला, समाजाला विश्वासात घेऊन इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची हमी देत मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे नेत आहेत. अशा संवेदनशील परिस्थीतीत संभाजीराजे यांच्यावर केलेली टिका अतिशय निंदणीय आहे. छत्रपती घराणे असल्यामुळेच आज आपल्या आया बहिणी सुरक्षीत आहेत. उच्चभ्रु मराठा समाजाला आज आरक्षण नको आहे. मात्र दारिद्रयाच्या खाईत खितपत पडलेल्या उपेक्षीत मराठा समाजाला न्याय मिळवून देणेसाठी खासदार संभाजीराजे सर्वानांच विश्वासात घेऊन आपले सर्व वैभव, मोठेपणा, राजेपणा सोडून सर्वांसाठी लढा देत आहेत. त्यांच्या या लढ्याला प्रोत्साहन देता आले नाही तरी चालेल पण त्यांची निंदा करु नये अशी विनंती घाटगे यांनी केली.
छत्रपती घराणे हे आमचे व महाराष्ट्राची अस्मिता व दैवत आहे. त्यामुळे येथून पुढे छत्रपती घराण्यावर अशी टिका कदापिही आपण सहन करणार नसल्याचे घाटगे यांनी सांगीतले. या पत्रकार परिषदेला संजय गांधी निराधार समितीचे माजी अध्यक्ष मा. धनराज घाटगे, मुरगूडचे माजी उपनगराध्यक्ष मा. धनाजी गोधडे, अन्नपूर्णा कारखान्याचे संचालक के के पाटील, राजू भराडे, एम. बी. पाटील, तानाजी पाटील, संतोष ढवन, के. बी वाडकर, एम. टी. पोवार,काका सावडकर,आनंदा तळेकर (अध्यक्ष), धोंडीराम एकशिंगे आदी मान्यवर उपस्थित होते.