प्रतिनिधी /पणजी
कोरोना महामारी संसर्गामुळे रद्द झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल शाळांमधील अंतर्गत मुल्यमापनावरुन आज सोमवार दि. 12 रोजी सायंकाळी 5 वा. गोवा बोर्डाच्या धोरणानुसार जाहीर करण्यात येणार आहे.
कोरोना महामारीमुळे एप्रिल – मे महिन्यात असणारी गोवा माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची (गोवा बोर्ड) दहावीची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली होती. बोर्डाच्या धोरणानुसार त्या दहावी विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्याची जबाबदारी शाळांवर सोपविण्यात आली होती. तो निकाल शाळांनी बोर्डास सादर केला असून बोर्डातर्फे तो आता जाहीर करण्यात येणार आहे.
सुमारे 23967 जणांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून त्यात 13011 मुले तर 10956 मुली यांचा समावेश आहे. यावेळी मुलांची संख्या मुलींपेक्षा जास्त असून 517 जणांनी फेरपरीक्षा देण्यासाठी नोंदणी केली आहे.
अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी तसेच डिप्लोमा प्रवेशासाठी वेगळी परीक्षा घेण्यात येणार असून त्या परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. नववीचे गुण तसेच शाळेतील विविध परीक्षेतील गुण यांची सरासरी साधून दहावीचा निकाल तयार करण्यात आला आहे.