तब्बल 2 कोटीहून अधिकजण भेट देणार : भारताचा समूह होणार सहभागी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आज 1 ऑक्टोबर 2021 पासून दुबई एक्सपो सुरू होत असून यात जगभरातील जवळपास 46,000 संघटना सहभागी होणार आहेत. एक्सपोला भेट देणाऱयांची संख्या तब्बल 2 कोटी 50 लाख राहणार असल्याची माहिती आहे. दुबईमधील प्रदर्शनात जगभरातील दिग्गज गुंतवणूकदार आणि व्यावसायिक मोठय़ा प्रमाणात हजर राहणार असल्याचे संकेत आहेत. साधारण 180 देशांतील विविध संघटनांचा सहभाग प्रदर्शनात असेल, अशी माहिती आहे.
प्रदर्शनात प्रत्येक देशाचे स्वतंत्र पव्हेलियन असणार असून यामध्ये भारताचेही स्वतंत्र पव्हेलियन असणार आहे, ज्याचे उदघाटन 1 ऑक्टोबर रोजी भारताचे वाणिज्य मंत्री पीयुष गोयल करणार आहेत. सदरचे एक्सपो 31 मार्च 2022 पर्यंत सुरु राहणार असून भारतामधून टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी, वेदान्ता, एचएसबीसी यासारख्या दिग्गज कंपन्यांचा यात सहभाग राहणार आहे. पव्हेलियनच्या आतमध्ये सांस्कृतिक रुपाने समृद्ध भारतासोबत अन्य विशेष गोष्टींचा समावेश करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
इंडियन पव्हेलियनचे वैशिष्टय़
संपूर्ण इंडियन पव्हेलियनचे वातावरण आणि बॉयोडायव्हर्सिटी, स्पेस, अर्बन ट्रव्हल ऍण्ड कनेक्टिविटी, ग्लोबल गोल्स, हेल्थ आणि वेलनेससह 11 थीमवर तयार करण्यात आले आहे. ज्यामध्ये स्पेस टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, इलेक्ट्रिक मोबिलिटी, एडू टेक, ई कॉमर्स, एनर्जी, सायबर सिक्युरिटी, हेल्थकेअर, स्टार्टअपचा समावेश असणार आहे. यातून नव्या इंडियाची झलक दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.
पव्हेलियनसाठी 500 कोटीचा खर्च
संयुक्त अरब अमिरातच्या दुबई शहरात दुबई एक्झिबिशन सेंटरमध्ये या एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. दुबईत भारताचे मुख्य काँसुलेट सिद्धार्थ कुमार बराइली यांनी म्हटले की, भारतीय पव्हेलियन तयार करण्यासाठी जवळपास 500 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. 438 हेक्टरमध्ये सदरचे पव्हेलियन पसरले आहे.
ठळक नोंदी :
- प्रत्येक देशांसाठी स्वतंत्र पव्हेलियन
- 18 स्टेशन, 200 लक्झरीसह 15 हजारहून अधिकच्या टॅक्सींची सोय
- कोरोनामुळे 2020 मधील कार्यक्रम 2021 मध्ये होतोय
- युएईमधील प्रवास करणाऱयांची संख्या 207 टक्क्यांनी वधारली
- अर्थव्यवस्थेमधील मजबूत स्थितीचे संकेत मिळताहेत
- 31 मार्च 2022पर्यंत सुरु राहणार एक्सपो