प्रतिनिधी /..सातारा
सातारा तालुक्यातील आरळे येथील एका रुग्णाला रक्तातील प्लाझ्माची अत्यंत गरज होती. याची माहिती मिळताच नगरसेवक अमोल मोहिते यांनी स्वतः कोरोनातून बरे होऊन त्या रुग्णाला स्वत:चे प्लाझ्मा दान केले आहे. त्यांनी केलेल्या या प्लाझ्मा दानामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नगरसेवक अमोल मोहिते हे वेगळंच व्यक्तीमत्व असून अडल्यानडल्याची मदत करणारे म्हणून त्यांची ओळख आहे. नुकतेच कोरोनातून ते बरे होऊन पुन्हा समाज कार्याला सुरुवात केली आहे. रुग्णांना बेड मिळवून देणे यासह विविध कार्य त्यांची सुरु आहेत. आरळे येथील एका रुग्णाला प्लाझ्माची गरज होती. रुग्णांचा ब्लड ग्रुप दुर्मीळ असल्याने सलग दोन-तीन दिवस खूप शोधाशोध केली तरी मिळत न्हवता, त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक हतबल झाले होते. त्यांनी गावातील साईराज कदम यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी नगरसेवक अमोल मोहिते यांना फोन करुन आपण प्लाझ्मा दान करावा अशी विनंती केली. त्यावर अमोल मोहिते यांनी लगेच तयारी दर्शवली आहे. शब्द दिल्याप्रमाणे त्यांनी त्या रुग्णासाठी आपला प्लाझ्मा दिला. नगरसेवक अमोल मोहिते हे स्वत: कोरोनोतून बरे होऊन लोकांसाठी रात्रदिवस झटताना दिसत आहेत.