प्रतिनिधी / फोंडा
फोंडा पालिकेच्या प्रभाग चार मधील नगरसेविका चंद्रकला नाईक यांनी नुकताच गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केला. गोवा फॉरवर्डचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांनी पक्षाचे चिन्ह असलेला नारळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांची पक्षात रितसर स्वागत केले.
चंद्रकला नाईक यांनी हल्लीच फोंडा भाजपा मंडळाच्या सचिवपदाचा राजीनामा दिला होता. यावेळी गोवा फॉरवर्डचे फोंडा गटप्रमुख नगरसेवक व्यंकटेश नाईक हे उपस्थित होते. गेल्या काही वर्षांपासून आपण फोंडा भाजप मंडळात सचिवपदी कार्यरत होते. पक्षाअंतर्गत महत्त्वाचे निर्णय घेताना आपल्याला कधीच विश्वासात घेतले नाही. उलट आमच्यावर विश्वासघाताचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे आपण भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश केल्याचे चंद्रकला नाईक यांनी यावेळी बोलताना सांगितले.
येणाऱया काळात फोंडय़ातील बरेच स्थानिक नेते व कार्यकर्ते गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश करणार असल्याचे किरण कांदोळकर यांनी सांगितले. व्यंकटेश नाईक हेच येणाऱया विधानसभा निवडणुकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार असतील. गोवा फॉरवर्ड येणाऱया निवडणुकीत समविचारी पक्षाची युती करण्याच्या विचारात आहेत. मात्र काँग्रेस व मगोतून भाजपामध्ये गेलेल्या फुटीर आमदारांना उमेदवारी देणाऱया पक्षाशी गोवा फॉरवर्ड अजिबात युती करणार नाही. राज्यातील 40 पैकी 30 जागा स्वबळावर लढविण्यास पक्ष समर्थ असल्याचे किरण कांदोळकर यांनी स्पष्ट केले. फोंडा पालिकेवर हल्लीच झालेल्या सत्ता बदलावेळी भाजपाने उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार निश्चित करताना आम्हाला विश्वासात घेतले नाही. प्रत्येक निर्णयात आपल्याला डावलण्यात आले. कोरोनाच्या काळात नगराध्यक्ष म्हणून आपण केलेले कार्य लोकांच्या स्मरणात असून यापुढेही लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना चांगली सेवा देण्याचा आपला प्रयत्न असेल, असे व्यंकटेश नाईक यांनी सांगितले.