ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये आणखी एक आठवडा बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला.
पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 27 टक्के आहे. तसेच पुण्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 71 हजारांच्या घरात आहे. ही रुग्णसंख्या पुढचे आठ दिवस खाली येण्याची शक्यता नाही. त्यामुळे पुण्याच्या महापौरांनी शाळा सुरू करण्यास नकार दर्शवला होता. यानंतर आज पालकमंत्री अजित पवारांच्या बैठकीत सध्या शाळा फक्त ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्याची घोषणा झाली आहे. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
सध्या राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. परंतू शाळांचा निर्णय स्थानिक पातळीवरील प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. त्यानुसार पुण्यातील परिस्थिती लक्षात घेता शाळा किमान एक आठवडा सुरु करायच्या नाहीत असा निर्णय घेतला आहे.