पेठवडगाव / प्रतिनिधी
पेठवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत श्रीपती भोसले (रा. प्लॉट न 30 भोसलेवाडी, कोल्हापूर ) याला पाच हजाराची लाच घेत असताना रंगेहाथ पकडून अटक केली. भोसले हे नुकतेच पदोन्नतीवर पेठवडगाव पोलीस ठाण्यात रुजू झाले होते.
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, सहाय्यक फौजदार बबंरगेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद पोरे, पोलीस नाईक नवनाथ कदम, सुनिल घोसाळकर आदीच्या पथकाने केली.
याबाबत समजलेली माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदाराविरोधी पेठवडगाव पोलीस ठाण्यात 306,498 अ,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये मदत करण्याकरीता पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत भोसले यांने पाच हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. याविषयी तक्रारदाराने कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यांची गांभीर्याने दखल घेवून गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा लावला. या सापळ्यात पोलीस उपनिरीक्षक भोसले पाच हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ सापडला. या कारवाईने जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.