ही अनोखी घटनाही उत्तर प्रदेशातीलच आहे. प्रत्येक पक्षाचे महत्त्वाचे प्रचारक रात्रंदिवस आपापल्या पक्षांना विजयी करण्याच्या प्रयत्नात गर्क झालेले आहेत. 10 मार्चला जेव्हा परिणाम समोर येतील, तेव्हा आपल्या चेहऱयावरच आनंद विलसावा, अशी त्यांची इच्छा दिसते. अशा वेळी भाजपच्या युतीतील एका महिला उमेदवाराच्या डोळय़ांत प्रचारकार्य करीत असताना आलेले आसू हा चर्चेचा विषय झाला आहे. त्यांचे आसू मतदारांच्या अंतःकरणातही आपुलकीचे भाव निर्माण करतात. या महिला उमेदवाराचे नाव केतकी सिंह असे असून त्या निषाद पक्षाच्यावतीने उभ्या आहेत. त्यांचा संघर्ष समाजवादी पक्षाच्या रामगोविंद चौधरी नामक बलदंड उमेदवाराशी होत आहे. केतकी सिंह या अत्यंत गरीब घरातील असून त्यांच्याकडे प्रचारासाठीही पैसे नाहीत. त्यामुळे त्या लोकांकडे मतांबरोबर आर्थिक साहाय्याचीही विनवणी करतात. त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने प्रचार चालविला असून मतदारांची व्यक्तिगत भेट घेण्यावर त्यांचा भर आहे. त्यांना युतीकडून केवळ एक कार मिळालेली आहे. त्या भोजपुरी भाषेतून प्रचार करतात. ‘अपना बहन की दीही चंद, ऊ एगो नोटसे ऐसन चोट कैल जाई की दुश्मन ध्वस्त हो जाई। आशीर्वाद दिहज लो, एक एक गो नोट घरे पहुँचा दा लो’, असे आवाहन त्या मतदारांना करतात. असंख्य मतदार त्यांना आर्थिक साहाय्य करीत आहेत. ते पाहून त्यांच्या डोळय़ात आसू येतात. त्यांना आर्थिक साहाय्य देणाऱयांमध्ये समाजाच्या गरीब वर्गातील लोक अधिक प्रमाणात असतात. एका मजुराने त्यांना आपली दोन दिवसांची 500 रुपयांची कमाई देऊन टाकली आहे. असे साहाय्य मिळाल्यामुळे त्या भारावून गेलेल्या आहेत. पत्रकारांना लोकांच्या अशा प्रतिसादाची माहिती सांगताना त्यांना अक्षरशः रडू कोसळते. त्यांची ही प्रचाराची पद्धत आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद चर्चेचा विषय बनला आहे.
Previous Articleकॅनडाचा ऍलियासिमे उपांत्यपूर्व फेरीत
Next Article ‘हिंदू जागा झाला तर दाढीची शेंडी होईल’
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.