वृत्तसंस्था/ झुरीच
फिफाच्या आगामी विश्व करंडक फुटबॉल पात्र फेरी स्पर्धेतील ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यातील सामना कोरोना समस्येमुळे रद्द करण्यात आला होता. दरम्यान या दोन्ही देशांच्या फुटबॉल संघटनांनी रद्द करण्यात आलेला सामना पुन्हा खेळवावा यासाठी फिफाकडे अपील करण्यात आले होते पण फिफाच्या लवाद समितीने हे अपील फेटाळले आहे.
या पात्र फेरीच्या स्पर्धेतील ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यातील हा सामना सप्टेंबरमध्ये झाला होता. या सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर केवळ काही मिनिटातच ब्राझीलच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी मैदानात प्रवेश करून अर्जेंटिना संघातील इंग्लंडमध्ये वास्तव्य असलेल्या कांही खेळाडूंनी कोरोना संदर्भातील क्वारंटाईन नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना खेळण्यास मनाई केली होती. त्याचप्रमाणे अर्जेंटिना आणि ब्राझील फुटबॉल फेडरेशनला प्रत्येकी 50,322 डॉलर्सचा दंड केला होता. यानंतर या दोन्ही देशांच्या फुटबॉल फेडरेशननी फिफाकडे दाद मागत हा सामना पुन्हा नव्याने खेळावावा असे नमूद केले होते पण फिफाच्या लवाद समितीने हे अपील फेटाळले.