प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य मंत्रिमंडळ पूनर्रचना पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. राज्य भाजप कार्यकारिणीची सभा पार पडली असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मंत्रिमंडळ पुनर्रचनेविषयी भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे मंत्रिपदाच्या शर्यतीत असणाऱया भाजप आमदारांनी प्रतीक्षेशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. मुख्यमंत्र्यांना कर्नाटकाविषयी दिल्लीमध्ये विशेष बैठक घेण्यात येईल, इतकाच निरोप देऊन नड्डा नवी दिल्लीला परतले आहे.
कर्नाटकाविषयी नवी दिल्ली येथे बैठक घेईन. बैठकीनंतर मंत्रिमंडळ पुनर्रचनेविषयी माहिती देण्यात येईल. त्यानंतरच दिल्लीला येण्याचे निमंत्रण जे. पी. नड्डा यांनी दिल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले आहे. त्यामुळे मागील 3 महिन्यांपासून मंत्रिमंडळ पुनर्रचनेचा मुद्दा खितपत पडला आहे.
होस्पेट येथील राज्य भाजप कार्यकारिणाच्यी बैठकीत सहभागी होण्यासाठी कर्नाटक दौऱयावर आलेले भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राज्य राजकारणाविषयी राज्यातील नेत्यांशी चर्चा केली आहे. परंतु, ते मंत्रिमंडळ पुनर्रचनेविषयी विस्तृत चर्चा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांना माहिती देतील. त्यानंतर लगेच मंत्रिमंडळ पुनर्रचनेला हिरवा कंदील मिळेल, असे राज्यातील नेत्यांनी गृहीत धरले होते. मात्र, त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्लीत याविषयी बैठक घेण्यात आल्यानंतरच कळविण्यात येईल, असे सांगितले आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचनेविषयी भाजपश्रेष्ठींचे भूमिका काय आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.