प्रतिनिधी/ कराड
कोरोनाचे रूग्ण वाढलेल्या मलकापूरला विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी दुपारी भेट दिली. अहिल्यानगर परिसराची पाहणी करून कोरोनाची साखळी तोडण्यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. दरम्यान मलकापूर आगाशिवनगर मायक्रो कंटेनमेंट झोनमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला असून सीसीटीव्ही कॅमेराद्वारे त्या परिसरावर लक्ष ठेवण्यात आले आहे.
मलकापूर, आगाशिवनगर परिसरातील कोरोनाची साखळी तुटत नसल्याने शहरवासिय प्रचंड दडपणाखाली आहेत. या भागातील रूग्णांची संख्या तब्बल 22 वर पोहचली आहे. त्यामुळे शहरवासियांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी दुपारी मलकापूरला भेट दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंग, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, धनंजय येडगे, पोलीस पाटील प्रशांत गावडे यांची उपस्थिती होती.
दुपारी 3.30 वाजता विभागीय आयुक्त मलकापुरात आले. त्यांनी अहिल्यानगर परिसराची पाहणी करून या भागातील कोरोनाच्या साखळीची माहिती घेतली. या भागात नगरपरिषदेने काय काय उपाययोजना राबवल्या आहेत, याची माहिती मनोहर शिंदे यांनी आयुक्तांना दिली. हा परिसर पूर्णतः सील केला असला तरी आणखी कडक उपाययोजना राबवण्याच्या सूचना आयुक्त म्हैसेकर यांनी दिल्या. मलकापुरात ज्यांनी सर्व्हे केला आहे किंवा अजुनही सर्व्हे सुरू आहे अशा सर्व अधिकारी, कर्मचारी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
दरम्यान मलकापूर, आगाशिवनगर येथील सुक्ष्म प्रतिबंधक क्षेत्रात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या परिसरातील कोणतीही व्यक्ती कोणत्याही कामासाठी घराच्या बाहेर येणार नाही, अशा सूचना आहेत. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक दर तासाला या भागातून संचलन करणार आहे. या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
कृष्णा रूग्णालयातही केली पाहणी
विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी कृष्णा रूग्णालयासही भेट दिली. रूग्णालयात पाहणी करून कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्याशी त्यांनी चर्चा केली. रूग्णालयातील कोविड कक्षासह सर्व उपाययोजनांची माहिती त्यांनी घेतली.