बायडन यांच्याकडून निर्बंधांचा तर पुतीन यांच्याकडून संबंध बिघडण्याचा इशारा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यात पुन्हा एकदा चर्चा झाली आहे. दुरध्वनी वरून झालेल्या या चर्चेत दोन्ही देशांमधील मतभेदही उघड झाले आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास किंवा कोणत्याही प्रकारे सीमा बदलण्याचा प्रयत्न केल्यास कठोर निर्बंध लादण्याचा इशारा बायडन यांनी दिला आहे. तर अमेरिकेने रशियाच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये हस्तक्षेप केल्यास दोन्ही देशांमधील संबंध तणावग्रस्त होतील असा इशारा पुतीन यांनी दिला आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये समझोता होण्याची शक्यता दुरावल्याचे दिसून येते.
गुरुवारी दोन्ही नेत्यांमध्ये साधारणतः एक तासभर मनमोकळी चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. रशियाने गेल्या काही आठवडय़ापासून युक्रेनच्या सीमारेषेवर सैन्याची जमवाजमव सुरू केल्याने युरोपमध्ये चिंतेचे वातावरण आहे. युक्रेन-रशिया युद्ध भडकल्यास त्याची झळ युरोपसह साऱया जगाला बसेल असा इशारा तज्ञांनी दिल्याने तणाव कमी करण्याचा प्रयत्न अमेरिका करीत आहे.
तणाव कमी करण्याचा आग्रह
गुरुवारच्या चर्चेत बायडेन यांनी पुतीन यांना युक्रेन सीमेवरील तणाव कमी करण्याचा आग्रह केला. अमेरिका आणि तिचे सहकारी देश तसेच भागीदार रशियाला त्याने युपेनवर हल्ला केल्यास निर्णायक प्रत्युत्तर देतील. रशियाने युक्रेनमध्ये आणखी घुसखोरी केल्या परिणाम गंभीर होतील असेही प्रतिपादन त्यांनी केले. दोन्ही नेत्यांमध्ये डिसेंबर महिन्यात दोनदा चर्चा झाली आहे.
दोन्ही देशांचे युक्रेनसंबंधी मतभेद असल्यामुळे त्यांना दोन परिस्थितींशी झगडावे लागत आहे. रशियाने सामोपचार किवा अमेरिकेचे निर्बंध या दोन पर्यायांपैकी कशाची निवड करायची हे ठरवायचे आहे असेही बायडन यांनी पुतीन यांना सांगितले. अमेरिकेचे धोरण रशियाच्या कृतीवरती अवलंबून राहिल रशियाने तणाव निर्माण करण्याचा मार्ग सोडल्यास अमेरिकाने शांततेच्या मार्गानेच पुढील वाढचाल करेल असेही बायडेन यांनी पुतीन यांना स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले.
पुतीन यांचे तीव्र प्रत्युत्तर
बायडन यांच्या वक्तव्यावर रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी तीव्र प्रत्युत्तर दिले असून गेल्या 30 वर्षांत अनेक चुका झाल्या असल्याचे नमूद केले. या चुका भविष्यकाळात टाळल्या पाहिजेत अन्यथा तणाव टाळणे अशक्य होईल असेही त्यांनी स्पष्ट केल्याने दोन्ही देशांमध्ये एकमत होण्याची शक्यता दुरावल्याचे तज्ञांचे मत आहे. पुतीन आणि बायडन यांचा रोख पाहता दोघानाही संयम राखण्याची आवश्यकता आहे असे जागतिक राजकीय तज्ञांनी बोलून दाखविले.