धोंडशिरेची जुनी दुखापत उफाळली, सराव सत्रादरम्यान हातालाही दुखापत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचा कसोटी उपकर्णधार रोहित शर्माची धोंडशिरेची दुखापत पुन्हा चिघळली असून यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी कसोटी मालिकेतून तो बाहेर फेकला गेला आहे. प्रारंभी, सोमवारी सराव सत्रादरम्यान थ्रो डाऊन स्पेशालिस्ट रघूकडून सराव घेत असताना एक चेंडू रोहितच्या हातावर आदळला. त्यानंतर त्याने काही काळ सरावही केला. पण, नंतर धोंडशिरेच्या दुखापतीमुळे तो मालिकेत खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. बीसीसीआयने प्रियांक पांचाळची पर्यायी खेळाडू या नात्याने निवड केली.
‘भारतीय संघाचा कसोटी उपकर्णधार रोहित शर्माला मुंबईत डाव्या धोंडशिरेची दुखापत पुन्हा उफाळली असून तो आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतून बाहेर फेकला गेला आहे. प्रियांक पांचाळ आता त्याची जागा घेईल, असे नंतर बीसीसीआयने पत्रकातून स्पष्ट केले.
अगदी अलीकडेच प्रियांक पांचाळने दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध 96 धावांची दमदार खेळी साकारली असून बीसीसीआयने सोमवारी रात्रीच त्याला पथकात दाखल होण्याची सूचना केली होती. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी दि. 26 डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये खेळवली जाणार आहे.
‘रोहित शर्माला सराव सत्रादरम्यान दुखापत झाली. वास्तविक, त्यानंतर त्याने काही कालावधीकरिता फलंदाजीचा सराव केला. मात्र, त्यानंतर धोंडशिरेची दुखापत झाल्याचे स्पष्ट झाले. यातून सावरण्यासाठी साधारणपणे 4 आठवडय़ांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे, या मालिकेत तो खेळू शकणार नाही, हे स्पष्ट आहे’, असे बीसीसीआयमधील एका सूत्राने नमूद केले.
उपकर्णधारपद केएल राहुलकडे?
अगदी लोएस्ट गेडमधील धोंडशिरेची दुखापत देखील बरी होण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लागू शकतो. या पार्श्वभूमीवर, मयांक अगरवाल व केएल राहुल ही जोडी सलामीला उतरण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, कसोटी संघाचे उपकर्णधारपद केएल राहुलकडे सोपवले जाऊ शकते, असे सध्याचे चित्र आहे.
युवा फलंदाज प्रियांक पांचाळने 100 प्रथमश्रेणी क्रिकेट सामने खेळले असून यात त्याने 24 शतकांसह 7011 धावांचे योगदान दिले आहे. पार्थिव पटेलच्या नेतृत्वाखाली रणजी चषक जिंकणाऱया गुजरात संघात प्रियांकचा प्राधान्याने समावेश होता. शिवाय, सध्या तो भारत अ संघाचे नेतृत्व भूषवत आहे.
उपकर्णधारपदासाठी रिषभ पंत व रविचंद्रन अश्विन यांचेही पर्याय उपलब्ध असतील. अलीकडेच अजिंक्य रहाणेला कसोटी उपकर्णधारपदावरुन डच्चू मिळाला असून त्याचे संघातील स्थानही धोक्यात असल्याचे मानले जाते. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका दि. 15 जानेवारीपर्यंत चालेल. त्यानंतर उभय संघात 3 वनडे सामन्यांची मालिका सुरु होईल. यातील पहिली लढत दि. 19 जानेवारी रोजी पार्ल येथे खेळवली जाणार आहे.