प्रतिनिधी/ वडूज
खटाव तालुक्यातील बांबाळे गावच्या हद्दीत वडूज पोलिसांनी दारू वाहतूक करणाऱया गाडीवर कारवाई करत मुद्देमालासह संशयीतांना अटक केली.
याबाबतची अधिक माहिती अशी, सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास वडूज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना बोंबाळे ते कातरखटाव दरम्यान अवैध दारू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. देशमुख यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत सापळा रचला असता बोंबाळे गावच्या दिशेने कातरखटावकडे एक पांढरा रंगाची स्कॉर्पिओ येत असताना दिसताच ती अडवून त्याची झडती घेतली. त्यामध्ये 10 बियरचे बॉक्स आढळून आले.
सदर बियरचे बॉक्स हे विनापरवाना वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर चालक राजेंद्र जालिंदर खाडे (वय 30 वर्षे रा. एनकुळ ता. खटाव) याला वडूज पोलीस ठाणे येथे आणून त्यांच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर स्कॉर्पिओमध्ये 10 बिअरचे बॉक्स असा एकूण 5 लाख 17 हजार 655 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो. कॉ. वाघमारे करीत आहेत.